विद्यार्थ्यांभोवती वाढतोय कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:27 AM2021-03-20T04:27:35+5:302021-03-20T04:27:35+5:30
गोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता कोरोनाने शाळांमध्येसुद्धा शिरकाव केला आहे. ...
गोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता कोरोनाने शाळांमध्येसुद्धा शिरकाव केला आहे. दोन दिवसांच्या कालावधीत १७ विद्यार्थी आणि ११ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांभोवती कोरोनाचा विळखा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
सद्य:स्थितीत इयत्ता पाचवीपर्यंतच्या शाळा सुरू आहेत. शाळा सुरू होऊन आता जवळपास पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. मागील तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे पालकसुद्धा आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवित होेते. मात्र महिन्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. याच अनुषंगाने आता शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. याच चाचणीदरम्यान गुरुवार आणि शुक्रवारी जिल्ह्यात एकूण १७ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले तर ११ शिक्षकांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याची बाब पुढे आली आहे. शुक्रवारी सालेकसा, अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी कोरोनाबाधित आढळला. त्यामुळे शाळांकडूनसुद्धा दक्षता बाळगली जात आहे. दरम्यान, शाळांमध्ये कोरोनाचा विळखा वाढल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हीच बाब ओळखून शिक्षण विभागानेसुद्धा किमान १५ दिवस शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे.
............
३१ मार्चपर्यंत शाळा राहणार बंद
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यातच आता शाळांमध्येसुद्धा कोरोनाने एन्ट्री केल्याने तसेच आतापर्यंत पाचवी ते आठवीपर्यंतचे १७ विद्यार्थी आणि ११ शिक्षक कोरोनाबाधित निघाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून २० ते ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासंबंधीचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले.
.....
विद्यालये राहणार बंद
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३१ मार्चपर्यंत पाचवी ते ११ वीपर्यंतच्या सर्व शाळा आणि विद्यालये तसेच शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयेसुद्धा बंद राहणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे त्यांना केवळ प्रात्यक्षिक परीक्षा देऊन घरी जाता येणार आहे. शनिवारपासून जिल्ह्यातील सर्व सरकारी, खासगी शाळा, विद्यालये बंद राहणार असल्याचे शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
.......
जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या सुरू असलेल्या शाळा
८५७
शाळेतील एकूण शिक्षकांची संख्या
३,८११
विद्यार्थ्यांची एकूण उपस्थिती
४५,२३८
आतापर्यंत कोरोना चाचणी झालेले शिक्षक
७५४
चाचणी झालेले शिक्षकेत्तर कर्मचारी
३,७४७