कोरोनाची दुसरी लाट ओसरली, पण निष्काळजीपणा नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:59+5:302021-06-16T04:38:59+5:30
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. रुग्ण संख्या सुध्दा नियंत्रणात आली असून मात करणाऱ्यांची संख्या वाढली ...
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. रुग्ण संख्या सुध्दा नियंत्रणात आली असून मात करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १२३ वर आली आहे. एकंदरीत जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. मात्र, लाट ओसरली म्हणून जिल्हावासीयांनी निष्काळजीपणा न बाळगता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोनाला जिल्ह्यातून पूर्णपण हद्दपार करू शकतो.
सोमवारी (दि.१४) जिल्ह्यात ६६ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यात गोरेगाव, आमगाव, सालेकसा या तीन तालुक्यांत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. १ जूनपासून सातत्याने कोरोना बाधितांची संख्या कमी होत असून मात करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एकंदरीत बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणारेच दुप्पट आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १८०५९४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १५५५७७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १८५१५३ नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १६४२२४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१०४७ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०२२७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १२३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. तर ६९७ बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
,,,,
२२७६ नमुन्यांची चाचणी, पॉझिटिव्ह केवळ ३
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी एकूण २२७६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १२९८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ९७८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ३ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१३ आहे. एकंदरीत कोरोना विषाणूने जिल्ह्यात परतीचा प्रवास सुरू केल्याचे चित्र आहे.
........
रिकव्हरी रेट ९७.८६ टक्के
कोरोना बाधितांपेक्षा जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७.८६ टक्के असून तो राज्याच्या रिकव्हरी रेटपेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळेच आता जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
........