वाहनाच्या धडकेत नगरसेवक पांडे ठार
By Admin | Published: December 12, 2015 04:17 AM2015-12-12T04:17:54+5:302015-12-12T04:17:54+5:30
गोंदिया शहरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या तिघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात गोंदियाचे नगरसेवक अनिल
कुडव्या नाक्यावरील अपघात : ‘मॉर्निंग वॉक’ करणारे दोघे गंभीर
गोंदिया: गोंदिया शहरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या तिघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात गोंदियाचे नगरसेवक अनिल भवानीप्रसाद पांडे (६२) हे ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारच्या सकाळी ७ वाजतादरम्यान कुडवा नाक्याजवळ घडली.
नगरसेवक पांडे हे नेहमीप्रमाणे रामनगर येथील राजेश पटेल व रेलटोली येथील संदीप (बबलू) ठाकूर यांच्यासोबत शुक्रवारच्या सकाळी मॉर्निंग वॉककरीता गेले असताना रामनगर ते कुडवा नाक्याकडून मरारटोलीच्या दिशेने कुडवा भागाकडे येत होते. याचवेळी एका अज्ञात चारचाकी वाहनाने तिघांनाही धडक दिली. त्यांना केएमजे हॉस्पीटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान अनिलकुमार पांडे यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेसंदर्भात पोलीस कर्मचारी कृष्णकुमार ठाकरे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ), मोटार वाहन कायदा कलम १३४(अ), (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या वेळी त्या ठिकाणावरून एक ट्रक व एक मेटॅडोर जात होते. यापैकी कोणत्या वाहनाने त्यांना धडक दिली याची माहिती मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या इसमांकडून मिळाली नाही. पोलीस याप्रकरणाचा तपास करीत आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याचा शोध सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)
कारच्या धडकेत माजी नगरसेवकाचा मुलगा ठार
४माजी नगरसेवक विकास शेंडे यांचे चिरंजीव हर्षल (२४) यांना रात्री फुलचूर रस्त्यावर एका कारने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारच्या रात्री ११.३० वाजतादरम्यान हर्षल शेंडे हे आमगाववरून मोटारसायकलने (एमएच ३५ यू ५०७६) गोंदियाला येत होते. फुलचूरच्या कामधेनू शोरूमजवळ जलद गतीने धावणाऱ्या अल्टो कारने त्याला उडविले. मृतक हर्षलचा वीडियोग्राफीचा व्यवसाय होता. स्थानिक एक केबल संचालकाला सेवा देत होता. तेथून परतताना सदर घटना घडली.