परसोडी येथे एमआरईजीएसच्या कामात ७० हजार रुपयांचा भ्रष्टाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:30 AM2021-04-02T04:30:21+5:302021-04-02T04:30:21+5:30
राजकुमार भगत सडक-अर्जुनी : तालुक्यातील मौजा परसोडी (सडक) येथे झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात रोजगार सेवक व ...
राजकुमार भगत
सडक-अर्जुनी : तालुक्यातील मौजा परसोडी (सडक) येथे झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात रोजगार सेवक व ग्रामसेवक यांनी ७० हजार ४५५ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे आढळून आल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार लघु पाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग आमगाव यांच्या अंतर्गत २५ मे २०१९ ला तांत्रिक मान्यता व १२ जून २०१९ ला प्रशासकीय मान्यता असलेले अकुशल काम १२ लाख ६१ हजार २६५ रुपयांचे, कुशल काम २ लाख ९० हजार ४५ रुपयांचे असे एकूण १६ लाख ५१ हजार ३१५ रुपयांचे खोलीकरण व साठवण बंधारा, आदींचे काम करायचे होते. ग्राम परसोडी येथील रोजगार हमी योजनेच्या कामाला ३ जानेवारी २०२१ पासून सुरुवात झाली व ७ मार्च २०२१ ला काम बंद झाले. या झालेल्या कामाचे मस्टर ऑनलाईन झाल्यामुळे काही गावकऱ्यांनी खोलीकरण व साठवण बंधाऱ्याच्या कामावर गावातील काही मजूर नसतांनाही त्यांच्या हजेरी लावून त्यांचेही पैसे मंजूर केल्याची बाब उघडकीस आणली आहे. लेखराम कोरे, राजकुमार कोरे, गोपाल शिवणकर, रायवन हेमने, विष्णू शिवणकर, प्रशांत लेंढे, रुकमानंद कोरे, नेपाल कोहळे, कोमल, कोहळे, प्रमोद मेंढे, अतुल हत्तीमारे, मुकुंदा मेंढे, निखिल वाढई यांनी याची परसोडीच्या ग्रामसेवकाकडे ८ मार्च २०२१ रोजी लेखी तक्रार केली. नाला सरळीकरणच्या कामात भ्रष्टाचार झाला असून, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. या मागणीमध्ये रोजगार सेवक सुधीर प्रकाश लेदे व कनिष्ठ अभियंता एस. मेश्राम हे दोषी असल्याचा आरोप गावकऱ्यांनी करीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
.........
ग्रामपंचायतीने घेतला कारवाईचा ठराव
१० मार्च २०२१ रोजी ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली. या सभेमध्ये प्रत्यक्ष कामावर असलेल्या मजुरांची मजुरी कमी व कामावर नसलेले गावातून स्थलांतरित झालेले असे बोेगस मजूर दाखवून त्यांची रोजी जास्त प्रमाणात दाखविण्यात आली. जे मजूर गावात नाही आणि प्रत्यक्षात कामावरही नाहीत अशा १५ मजुरांच्या बोगस हजेरी लावून रोजगार सेवक व अभियंता यांनी ७० हजार ४५५ रुपयांचे बोगस बिल दाखविण्यात आल्यामुळे रोजगार सेवक सुधीर लेढे व कनिष्ठ अभियंता मेश्राम यांच्यावर योग्य चौकशी करून कारवाई करण्याचे ठराव घेण्यात आले.
बॉक्स
गावकऱ्यांनी मग्रारोहयोमध्ये झालेला बोगस हजेरीच्या भ्रष्टाचाराबाबत ग्रामपंचायतीमध्ये तक्रार केली असून, त्याबाबत चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी याकरिता पंचायत समिती सडक अर्जुनीचे खंडविकास अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार केली आहे.
- राजकुमार पटले, ग्रामसेवक परसोडी,
.........
मस्टरमध्ये दाखविलेल्या बोगस हजेरी दाखवून मजूर गावात व कामावर नाहीत ही बाब दुर्दैवी आहे. काम चांगले झाले असेच माझे प्रयत्न असते. आम्ही रोजगार सेवकावर विश्वास ठेवून काम करीत असतो. झालेल्या प्रकाराशी माझा कुठलाही संबंध नाही. माझ्यावरील आरोप तथ्यहीन आहेत.
एस. मेश्राम, अभियंता लघु पाटबंधारे विभाग.