अवघा ३५.३१ टक्के निधी खर्च
By admin | Published: February 12, 2017 12:31 AM2017-02-12T00:31:47+5:302017-02-12T00:31:47+5:30
जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक शनिवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री राजकुमार बडोले
शिक्षण, आरोग्य व तंत्रज्ञान विभाग माघारले : पालकमंत्र्यांनी डिपीडीसीत व्यक्त केली नाराजी
गोंदिया : जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक शनिवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या सन २०१६-१७ या चालू आर्थिक वर्षासाठी नियोजित निधीचा आढावा घेतला. मात्र निधी खर्च करण्यात अनेक विभाग पिछाडीवर असल्याचे दिसून आले. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघा दिड महिना शिल्लक असताना एकूण मंजूर नियतव्ययाच्या केवळ ३५.३१ टक्के निधी खर्च झाल्याचे पाहून पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. येत्या ३१ मार्चपर्यंत संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी तातडीने कामाला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.गोपालदास अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, आ.संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकूंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्यासह सर्व विभागांचे जिल्हा आणि विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रपरिषदेत पालकमंत्र्यांनी आढाव्याची माहिती दिली. जिल्ह्यात सर्वसाधारण योजनेसाठी ११८ कोटी ३८ लाख मंजूर नियतव्यय होता. तेवढीच अर्थसंकल्पीय तरतूद करून निधीही प्राप्त झाला होता. मात्र त्यापैकी केवळ २६ कोटी ५५ लाख ८७ हजार रुपये म्हणजे केवळ २२.४२ टक्के निधी खर्च झाला आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती उपाययोजना, आदिवासी उपयोजना आणि ओटीएसपी योजनेअंतर्गत प्राप्त निधीही बऱ्याच प्रमाणात खर्च झालेला नाही. सर्व योजना मिळून केवळ ८२ कोटी ५ लाख २१ हजार रुपये खर्च झाले आहेत.
या बैठकीत नवीन आर्थिक वर्षासाठी अनेक कामांवर भरीव तरतूद करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठात्यांना १५ दिवसांचा अल्टीमेटम
या पत्रपरिषदेत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अव्यवस्था व ढिसाळ कारभाराचा विषय पत्रकारांनी छेडला. त्यावर पालकमंत्र्यांनी अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया यांना चांगलेच धारेवर धरले. मेडिकल कॉलेजच्या विदर्भवीर प्राध्यापकांसह संपूर्ण कारभार येत्या १५ दिवसात रूळावर आणण्याचा निर्वाणीचा इशारा पालकमंत्र्यांनी त्यांना दिला. तसेच केटीएस रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिन सुरू करण्यासाठी काय पाहीजे ते सांगा पण ही सेवा तातडीने सुरू करा, असे ते म्हणाले