देशाला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:23 AM2018-04-15T00:23:10+5:302018-04-15T00:23:10+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहात आहे. पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही. देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे. आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते ते जनरल डायरने घडविले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहात आहे. पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही. देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे. आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते ते जनरल डायरने घडविले होते. तर मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकरी आंदोलनावर गोळीबार करुन भाजप सरकारने देशात जनरल डायर अस्तित्वात असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे देशाला संघाच्या संविधानाची नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची खरी गरज असल्याचे मत जेएनयुचे विद्यार्थी नेते मोहित पांडे यांनी शुक्रवारी (दि.१३) येथे व्यक्त केले.
गोंदिया येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने शुक्रवारी (दि.१३) तहसील कार्यालयासमोरील पटागंणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष धीरज मेश्राम होते. या वेळी जेएनयुच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशीद, यवतमाळचे रमेश जीवने, मिलिंद गणवीर, अनिल रामटेके, निलेश देशभ्रतार उपस्थित होते. पांडे म्हणाले, ग्रामीण भागातील वंचित मुलांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी बाबासाहेबांनी जेएनयुसारखे शैक्षणिक केंद्र असावे अशी त्यांची विचारधारा होती. मात्र आज बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्र ांतीलाच लगाम लावण्याचे काम सुरु असल्याचा आरोप केला. शिक्षणाची दारेच बंद करण्याचे काम केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार करीत असल्याची टिका केली. जेएनयुमधील शिक्षणाच्या सुविधा बंद करु न गरीब सामान्य घरातील मुलांच्या उच्च शिक्षणाला लगाम लावण्याचे काम जोमात सुरु झाले आहे. तर दुसरीकडे मन की बात सांगून लोकांना दिशाभूल करणारे प्रधानसेवक मात्र त्यांच्या डोळ्यासमोर होणाऱ्या शेतकरी आत्महत्या विसरले आहेत. शैक्षणिक अत्याचारात रोहीतची हत्या करून आंतक निर्माण करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारने केला आहे. अल्पसंख्याक, दलित व महिला हे एकत्र येऊ नये, अशी विचारधारा असलेली संघटना नागपूरात आहे. ती म्हणजे आरएसएस होय.
नाथुरामच्या समोरील राम हटवू शकले नाही पण बाबासाहेबांच्या नावात राम लावायला चालणारे हे लोक देशात शुद्र अतिशुद्राचे राजकारण करित आहेत. आपला आवाज बुलंद करण्यासाठी मुक्या असलेल्या संसदेसमोर काही बोलून होणार नाही, तर त्यासाठी रस्त्यावर उतरु न लढाई लढावी लागणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.
अन्यायाविरुद्ध बोलणे म्हणजे राष्ट्रविरोधी - शेहला रशीद
देशात महिलांवर अत्याचार होत असताना भाजपाची ‘बलात्कारी बचाव’ मोहीम सुरू आहे. सामाजिक न्यायाची कुचंबणा होत असताना राष्ट्रवादी म्हणवणारे बोलत नाही. तर, जे लोक या अन्यायाविरोधात बोलतात त्यांना राष्ट्रविरोधी ठरविले जाते. काश्मिरात हिंदू एकतेचे नावाने भाजपची जी शाखा काम करीत आहे, तीचे काम बघून भाजपा नव्हे तर भारत जलाव पार्टी असल्याची घणाघाती टिका जवाहरलाल जेएनयुच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी केली.