कालव्यात पडून दाम्पत्याचा मृत्यू : अचानक घरसला पाय अन् ती कालव्यात पडली, पत्नीला वाचविण्यासाठी आलेल्या पतीचाही मृत्यू
By नरेश रहिले | Published: April 19, 2024 05:53 PM2024-04-19T17:53:54+5:302024-04-19T17:58:22+5:30
Gondiya: पत्नीला वाचवण्याचा पतीचा प्रयत्न फसला, कालव्यात घसरून पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
गोंदिया: तालुक्याच्या चोरखमारा येथील कालव्यात पडून दाम्पत्याचा मृत्यू झाला. ही घटना १९ एप्रिल रोजी दुपारी घडली. सरिता मुनेश्वर कुंभारे (३८) व मुनेश्वर श्रीराम कुंभारे (५०) असे मृत दाम्पत्यांची नावे आहेत.
सरीता कुंभारे गावाबाहेर शेळ्या चारण्याकरिता गेली होती. ती गावाजवळील कालव्यावर शेळ्या चारत असताना ती कालव्याच्या पाळीवर उभी होती. त्यावेळी तिचा पाय घसरल्याने ती कालव्यातील २० फूट खोल कालव्याच्या पाण्यात पडली. सरिता कुंभारेच्या बाजूला एक महिला गुरे-ढोरे चारत होती. तिचा लक्ष सरिताकडे गेला. तिने सरिता कालव्याच्या पाण्यात पडली तिला वाचवा, अशी ओरडू लागली. तिचे ओरडणे ऐकून सरिताचा पती मुनेश्वर श्रीराम कुंभारे (५०) हा तिला वाचविण्यासाठी कालव्यावर गेला. त्याने वेळ न घालवता कालव्यात उडी घेतल्याने तो सुध्दा पाण्यात बुडाला. यात त्या दाम्पत्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. तिरोडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह नहरामधून काढून उत्तरीय तपासणीसाठी तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तपास तिरोडा पोलीस हवालदार तिरपुडे करीत आहेत. एकाच दिवशी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने चोरखामरा गावामध्ये शोककळा पसरली आहे.