विजेच्या तारांच्या धक्क्याने दाम्पत्याचा मृत्यू, एक महिला गंभीर
By नरेश रहिले | Published: September 20, 2023 04:50 PM2023-09-20T16:50:46+5:302023-09-20T16:53:18+5:30
विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे लंजे दाम्पत्याचा मृत्यू
गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्याच्या ग्राम घाटबोरी / कोहळी येथील शेतात तुटलेल्या जीवंत विद्युत ताराला स्पर्श झाल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. तुळशीदास रेवाराम लंजे (४५) व माया तुळशीदास लंजे (४२) दोन्ही रा. घाटबोरी/ कोहळी अशी दाम्पत्यांची नावे आहेत. तर इंदु हिरालाल लंजे (४३) ह्या गंभीर जखमी आहेत.
सडक-अर्जुनी तालुक्याच्या कोदामेडी ते सिंदीपार मार्गावरील आपल्या शेतात धानाचे निंदण करण्यासाठी लंजे कुटुंबातील दोन भावंडे २० सप्टेंबर रोजी सकाळी शेतात गेले असतांना शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा शॉक लागल्याने या दाम्पत्याचा मृत्यू झाला. या घटनास्थळावर हिरालाल लंजेही उपस्थित होते. करंटमुळे ते खाली पडले असल्याची बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी विद्युत तारेला लाकडी काठीने लांब फेकले, त्यामुळे इंदु हिरालाल लंजे यांचे प्राण वाचविले. त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय सडक-अर्जुनी येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच शेतकरी, गावकरी, पोलिस व विद्युत विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा तयार करण्यात आला. विद्युत विभागाने शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
सहा दिवासांपूर्वी केली होती तक्रार
शेतकरी लंजे यांच्या शेतातून विद्युत विभागाची ३३ एल. टी. लाईन गेली आहे. पाऊस व वाऱ्याने या लाईन चे तार ५ ते ६ दिवसापासून तुटून पडले होते. याची माहिती काही शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला दिली होती. मात्र विद्युत विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे काही शेतकरी सांगतात. विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे लंजे दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे.