न्यायालयीन मित्राने घेतली सारस संवर्धनाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:40+5:302021-07-11T04:20:40+5:30
गोंदिया : दुर्मीळ होत चाललेल्या सारस पक्ष्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्यात आहे. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून सारस ...
गोंदिया : दुर्मीळ होत चाललेल्या सारस पक्ष्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्यात आहे. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून सारस पक्ष्यांच्या संख्येत घट होत आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भातील बातमी २६ जून रोजी प्रसिद्ध केली होती. त्याचीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. यासाठी न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. राधिका बजाज यांची नियुक्ती केली. या याचिकेच्या संदर्भाने ॲड. बजाज यांनी शनिवारी (दि. १०) गोंदिया येथे भेट देऊन सारस संवर्धनाची माहिती घेतली.
गोंदिया जिल्हा तलावांचा आणि धान उत्पादकांचा जिल्हा आहे. पक्ष्यांसाठी अनुकूल वातावरण आणि त्यांचे आवडते खाद्य मिळत असल्याने दरवर्षी हजारोंच्या संख्येने विदेशी पक्ष्यांचे गोंदिया जिल्ह्यात आगमन होते, तर दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांची सर्वाधिक संख्यासुद्धा गोंदिया जिल्ह्यात आहे. २००६ पासून सेवा व इतर पर्यावरण प्रेमी संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सारस संवर्धनासाठी उपाययोजना केली जात आहे. त्यामुळे गोंदिया, भंडारा, बालाघाट या जिल्ह्यांमध्ये सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली होती. सारस पक्ष्यांच्या वाढत्या संख्येमुळे सारसांचा जिल्हा अशी नवी ओळखसुद्धा जिल्ह्याला मिळू लागली होती. मात्र, १५ ते १९ जुलै दरम्यान या तिन्ही जिल्ह्यांत घेण्यात आलेल्या सारस गणनेत सारस पक्ष्यांची संख्या १५ ने घटली होती. ती संख्या आता ९५ वर आली. या संदर्भातील सविस्तर बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. याचीच उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत सारस संवर्धनाच्या अनुषंगाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच यासाठी न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. राधिका बजाज यांची नियुक्ती केली. या याचिकेवर आता लवकरच सुनावणी होणार असून, त्या दृष्टीने माहिती घेण्यासाठी ॲड. बजाज या शनिवारी गोंदिया येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी वन, वन्यजीव विभाग, सारस संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून माहिती घेतली. यावेळी सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी सारस संवर्धनाचा एक अहवाल ॲड. बजाज यांना दिल्याची माहिती आहे.
.............
परसवाडा, झिलमिली परिसराची केली पाहणी
सारस संवर्धनासाठी गोंदिया तालुक्यातील परसवाडा, झिलमिल या जलाशय परिसरात पक्ष्यांसाठी खाद्य लावले जात आहे. तसेच या परिसरात सारसांचे बरेचदा वास्तव्य असते. या गावांमधील गावकरी आणि शेतकरीसुद्धा सारस संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ॲड. राधिका बजाज यांनी दोन गावांना शनिवारी आवर्जून भेट देऊन माहिती घेतली.