गोंदियात एक मृत्यूसह १० कोरोना बाधितांची भर; वर्षभरात प्रथमच एवढ्या रुग्णांची नोंद
By अंकुश गुंडावार | Published: April 6, 2023 03:49 PM2023-04-06T15:49:53+5:302023-04-06T15:53:29+5:30
नागरिकांनो प्रतिबंधात्मक नियमाचे करा पालन
गोंदिया : राज्यात मुंबईसह इतर भागात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात गुरुवारी (दि.६) एकाच दिवशी १० कोरोना बाधितांची भर पडली तर उपचार घेत असलेल्या एका ६५ वर्षीय रुग्णाचा येथील शासकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. मागील वर्षभराच्या कालावधीनंतर प्रथमच एकाच दिवशी १० कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे ही बाब काहीशी जिल्हावासीयांच्या दृष्टीने काळजी वाढविणारी आहे.
राज्यातील काही भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने शासनाने आरोग्य यंत्रणेला कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्या संदर्भात अर्लट दिला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचण्यांची संख्या सुध्दा वाढविण्यात आली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत ११० जणांची चाचणी करण्यात आली. यात १० कोरोना बाधित रुग्ण आढळले. यात २९ जणांची आरटीपीसीआर तर ७३ जणांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली.
बुधवारी १० नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १४ वर पोहचली आहे. तर कोरोनाचा पाझिटिव्हिटी रेट ८.८९ टक्के आहे. तर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या एका ६५ वर्षीय रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांना काळजी घेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
दहा रुग्णालयात ७४४ बेडची व्यवस्था
कोरोना बाधितांचीे संख्या वाढल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करता यावा यासाठी ऑक्सिजन बेडची कमतरता भासू नये यासाठी शासकीयसह ८ खासगी रुग्णालयात ७४४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आरोग्य यंत्रणेला अर्लट राहण्याचे निर्देश दिले आहे.