जिल्ह्यात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हीशिल्डच ‘फेव्हरेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:25 AM2021-04-03T04:25:29+5:302021-04-03T04:25:29+5:30
गोंदिया : देशात कोरोनाचा वाढता उद्रेक बघता लसीकरणावर भर दिला जात असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी उपाययोजना ...
गोंदिया : देशात कोरोनाचा वाढता उद्रेक बघता लसीकरणावर भर दिला जात असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार, देशात तयार करण्यात आलेल्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन व सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हीशिल्डचे डोस दिले जात आहेत. मात्र जिल्ह्यात लसीकरणाला घेऊन जिल्हावासीयांचा कल सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हीशिल्डकडे जास्त दिसून येत आहे. जिल्ह्याला आतापर्यंत तब्बल एक लाख ३२ हजार ३४० डोस कोव्हीशिल्डचे मिळाले आहेत.
मध्यंतरी नियंत्रणात असलेला कोरोना पुन्हा एकदा कहर करीत आहे. अवघ्या देशातच कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने पुन्हा एकदा मागील वर्षासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. काही जिल्ह्यांतील स्थिती हाताबाहेर गेल्याने लॉकडाऊनची पाळी तेथे आली आहे. अशात आता कोरोनाला हरविण्यासाठी हाती लस आली असून जास्तीत जास्त लसीकरण हाच यावर एकमेेव उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. या दृष्टीने आता शासनाने ४५ वर्षे वयोगटातील प्रत्येकच नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिली असून त्यानुसार लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरणासाठी भारताने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन तर सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हीशिल्ड लसीला मंजुरी दिली असून त्याद्वारे लसीकरण मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यातील स्थिती बघता गुरूवारपर्यंत (दि.१) ८६३५८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र यातील विशेषता अशी की नागरिकांचा कल सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हीशिल्डकडे जास्त दिसत असून लसीकरण झालेल्यांमधील ५० टक्के पेक्षा जास्त नागरिकांनी कोव्हीशिल्डचाच डोस घेतला आहे.
-----------------------------
आतापर्यंत मिळाले १.८२ लाख डोस
केंद्र शासनाच्या आदेशानुसार १६ जानेवारीपासून अवघ्या देशातच लसीकरण सुरू झाले. तेव्हापासून आतापर्यंत टप्याटप्याने शासनाकडून जिल्ह्याला लसींचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्याला एक लाख ८२ हजार ३४० डोस मिळाले आहेत यात एक लाख ३२ हजार ३४० डोस कोव्हीशिल्डचे आहेत, हे विशेष. आता कोव्हीशिल्ड जिल्हावासीयांची ‘फेव्हरेट’लस ठरत असे म्हणणे वावगे ठरणार नसून यामुळेच तिचे जास्त डोज पाठविले जात असावेत असे म्हणणेही वावगे ठरणार नाही.
-------------------------------
८६३५८ नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यात गुरूवारपर्यंत (दि.१) झालेल्या लसीकरणानंतर ८६३५८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये १३७७६ आरोग्य कर्मचारी, १८६७५ फ्रंटलाईन वर्कर्स, १६३२२ नागरिक ४५ ते ६० वयोगटातील तर ३७५८५ नागरिक ६० वर्षांवरील वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे, यातील ६२११३ नागरिकांनी कोव्हीशिल्डचा डोस घेतला असून २४२४५ नागरिकांनी कोव्हॅक्सीनचा डोस घेतला आहे.