पेट्रोल,डिझेल दरवाढी विरोधात भाकपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:00 AM2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:01:05+5:30
पेट्रोल, डिझेलच्या दरात करण्यात आलेली दरवाढ त्वरीत मागे घेण्यात यावी, या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. देशात सर्वत्र मागील तीन महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन आहे. त्यामुळे आधीच जनता त्रस्त झाली आहे. त्यातच आता सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केल्याने महागाई वाढणार असून याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केल्याने महागाईचा दर देखील वाढणार असून ही दरवाढ त्वरीत मागे घेण्यात यावी. अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टी जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आली. तसेच शहरातील जयस्तंभ चौकात शनिवारी या विरोधात निदर्शने करण्यात आली.
पेट्रोल, डिझेलच्या दरात करण्यात आलेली दरवाढ त्वरीत मागे घेण्यात यावी, या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. देशात सर्वत्र मागील तीन महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन आहे. त्यामुळे आधीच जनता त्रस्त झाली आहे. त्यातच आता सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केल्याने महागाई वाढणार असून याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. त्यामुळे सरकारने केलेली दरवाढ त्वरीत मागे घेण्याची मागणी केली. पेट्रोलियम कंपन्यांनी मागील सहा महिन्यात ११ वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल दरात ६ रुपये व डिझेलच्या दरात ६.४० रुपये वाढ केली. पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे ही दरवाढ त्वरीत मागे घेण्यात यावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाकपने निवेदनातून दिला आहे.
शिष्टमंडळात हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणविर, प्रल्हाद उके, करुणा गणविर, परेश दुरूगवार, छन्नु रामटेके, सुरेश रंगारी, क्रांती गणविर, राकेश हिरदे, कैलास राऊत, मुकेश हिरदे, सुुशिल शेंदरे, कल्पना डोंगरे यांचा समावेश होता.