बांधकाम सुरु असताना नालीवरील स्लॅबला पडल्या भेगा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:37 AM2021-04-30T04:37:31+5:302021-04-30T04:37:31+5:30
आमगाव : शहरात रेल्वेस्टेशन ते लांजी रोड वाघ नदीपर्यंत रस्त्याचे व नाली बांधकाम सुरु आहे. नाली बांधकामात संबंधित कंत्राटदार ...
आमगाव : शहरात रेल्वेस्टेशन ते लांजी रोड वाघ नदीपर्यंत रस्त्याचे व नाली बांधकाम सुरु आहे. नाली बांधकामात संबंधित कंत्राटदार अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून बांधकाम करीत असल्याचा आरोप शहरवासीय आणि व्यावसायिकांनी केला. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शहरातील रस्त्याच्या एका कडेला नालीचे बांधकाम सुरू असताना नालीवरील स्लॅबला भेगा पडल्याने तेथील लोकांनी याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यानंतर उपविभागीय अभियंता सुनील बडगे व अधिकाऱ्यांनी भेट देऊन नाली बांधकाम समाधानकारक नसल्याने कंत्राटदाराची कानउघडणी केली. शहरातील रस्ते, नाल्या व बांधकाम करण्याचा कंत्राट शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाला. त्यांनी हे काम करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केले. मात्र ते कामाची वाट लावत असल्याचा आरोप आहे. कोरोना संचारबंदीमुळे व्यावसायिकांची दुकाने बंद आहेत. अशातच त्यांच्या दुकानासमोर नाली बांधकाम सुरू असून याचाच फायदा घेत ठेकेदार नाली बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याचा आरोप आहे. नालीच्या भिंतींना पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र दिलेले नाहीत. नालीवरील स्लॅबला पाणी देत नसल्याने काही तासातच नालीवरील भेगा पडले आहेत. लाखो रुपये खर्चून हे बांधकाम केले जात आहे. शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने होत असल्याने नालीचे काम चांगल्या दर्जाचे होणे गरजेचे असतानाही संबंधित ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे. नाली बांधकाम देखरेख करीत असलेल्या सुपरवायझरला विचारले असता कंपनी आम्हाला छिद्राकरिता पाईप, स्लॅब करिता साहित्य व पाणी साचून राहील याकरिता पोते पुरवित नसल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची पाहणी केली असून आता कंत्राटदारावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.