प्रारूप प्रभाग रचना तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:32 AM2021-08-22T04:32:05+5:302021-08-22T04:32:05+5:30
गोंदिया : नगर परिषदेची मुदत संपत आली असून, निवडणुकांचा कालावधी जवळ येत असल्यामुळे प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याबाबत राज्य ...
गोंदिया : नगर परिषदेची मुदत संपत आली असून, निवडणुकांचा कालावधी जवळ येत असल्यामुळे प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे आदेश धडकले आहेत. यामुळे आता नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार असून, प्रशासन कामाला लागणार आहे. तर दुसरीकडे राजकारण्यांचीही धावपळ सुरू होणार आहे.
डिसेंबर २०१७ मध्ये नगर परिषदेची निवडणूक आटोपली होती व फेब्रुवारी महिन्यात नवीन कार्यकाळ सुरू झाला होता. म्हणजेच आता त्यांची मुदत संपत आली असून, या निवडणुका नगर परिषदेची मुदत संपण्यापूर्वी बंधनकारक आहे. करिता राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्याबाबत आदेश दिले आहेत. सन २०११ मधील जनगणना विचारात घेऊन प्रारूप प्रभाग रचना तयार करावयाची असून, त्यानुसारच सदस्यसंख्या निश्चित करून तितक्या प्रभागांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करावयाचा आहे. विशेष म्हणजे, हे सर्व करताना आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचना व न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे आणि प्रभार रचना नियमातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावयाचे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले आहेत.
आयोगाच्या आदेशानुसार सोमवारपासून (दि. २३) प्रभार रचनेची कामे सुरू करावयाची असून, असे करताना मागील निवडणुकीनंतर अधिसूचनेमध्ये हद्दीत झालेले बदल, विकासकामांमुळे झालेले भौगोलिक बदल आदी विचारात घेऊन त्यांचे क्षेत्र निश्चित करून नकाशे तयार करावयाचे आहे. यासाठी क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, संगणक तज्ज्ञ तसेच आवश्यकतेनुसार अधिकाऱ्यांची समिती मुख्याधिकाऱ्यांना करावयाची आहे.
----------------------------
आता प्रत्येक प्रभागात एकच सदस्य
मागील निवडणुकीत प्रत्येक प्रभागात दोन सदस्य होते. मात्र, यंदा प्रत्येक प्रभागात फक्त एकच सदस्यीय पद्धती लागू करण्यात आली आहे. अशात त्यानुसार सदस्यसंख्या निश्चित करूनच प्रारूप प्रभाग रचना तयार करावयाची आहे.
--------------------
निवडणुकीचा बिगुल वाजणार
मागील निवडणूक डिसेंबर महिन्यात झाली असल्याने आता फक्त तीनच महिने उरले आहेत. त्यात आता प्रारूप प्रभार रचना तयार करण्यास सुरुवात होणार असल्याने एकप्रकारे नगर परिषदेचा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यामुळे विद्यमानांसह इच्छुकांची धावपळ सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, शहरात अशा नेत्यांनी आपली तयारी व भेटीगाठी सुरू केल्याचे दिसतही आहे.