कोविड तपासणी करण्याचे स्वतंत्र पथक तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:21 AM2021-04-29T04:21:35+5:302021-04-29T04:21:35+5:30
केशोरी : या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी या सारख्या आजाराने बाधित असलेले ...
केशोरी : या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी या सारख्या आजाराने बाधित असलेले रुग्ण आरोग्य विभागाला अंधारात ठेवून भीतीपोटी घरगुती उपचार करीत आहेत. कोरोनाचे नियम न पाळता गावात फिरत असल्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे बोलले जाते. तालुका आरोग्य प्रशासनाने घरोघरी जाऊन कोविड तपासणी स्वतंत्र पथके तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
केशोरी कनेरी या ठिकाणी झालेल्या कोरोनाचा विस्फोट लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रासाठी घालून दिलेले नियम कोरोनाबाधित रुग्ण पाळत नाहीत. मागील एक महिन्यापासून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲण्टिजेन टेस्ट करून रुग्णांवर औषधोपचार केले जातात. काही लोक गावात ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी आजाराने त्रस्त आहेत. मात्र, रुग्ण आरोग्य विभागाला माहिती न देता घरच्या घरीच उपचार करून गावभर फिरत असतात. यामुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येते. यावर आळा घालण्यासाठी घरोघरी जाऊन कोविड चाचणी करण्याचा उपक्रम राबविण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने स्वतंत्र पथक तयार करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.