रेल्वे स्थानकावर पादचारी मार्ग व उड्डाणपूल तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 08:56 PM2019-01-28T20:56:42+5:302019-01-28T20:57:33+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव रेल्वेस्थानकावर उड्डाणपूल व पथरस्ता नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांची फारच गैरसोय होत आहे. प्लॅटफार्म क्र.२ वरुन प्लॅटफार्म क्र.१ वर जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना एका प्लॅटफार्मवरुन दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्यासाठी रेल्वे रुळावरुन जावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव रेल्वेस्थानकावर उड्डाणपूल व पथरस्ता नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांची फारच गैरसोय होत आहे. प्लॅटफार्म क्र.२ वरुन प्लॅटफार्म क्र.१ वर जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना एका प्लॅटफार्मवरुन दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्यासाठी रेल्वे रुळावरुन जावे लागते.
रेल्वे रुळापासून प्लॅफार्मची उंची जास्त असल्यामुळे चढताना व उतरताना प्रवाशांना फारच त्रास सहन करावा लागतो. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची फारच गैरसोय होते. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेवून देवलगाव रेल्वे स्थानकावर उड्डाणपूल व पथमार्ग तयार करण्याची मागणी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी रेल्वे अधिकाºयांकडे अनेकदा पत्रव्यवहार करून देवलगाव रेल्वे स्टेशनवर उड्डाणपूल व पथमार्ग तयार करण्याची मागणी केली होती. परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षरीनिशी निवेदन सुध्दा रेल्वे अधिकाऱ्यांना दिले होते. तेव्हा रेल्वे अधिकाºयांनी पदचारी मार्ग लवकरच तयार करण्याचे पत्र सुध्दा दिले होते. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटूनही हा पदचारी मार्ग अद्यापही तयार करण्यात आला नाही.
रेल्वे मार्ग ओलांडून जाणे हा रेल्वेच्या नियमानुसार गुन्हा आहे. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना या नियमाचे उल्लघंन करावे लागत आहे.
वर्षभराचा कालावधी लोटूनही पादचारी मार्ग आणि उड्डाणपूल तयार करण्याचे कामे रेल्वे प्रशासनाने सुरु केले नाही. त्यामुळे नवेगावबांध येथील नागरिकांमध्ये रेल्वे प्रशासनाप्रती रोष व्याप्त आहे.
देवलगाव रेल्वे स्टेशनवर प्लॅटफार्मचे विस्तारीकरण झाले. प्लॅटफार्म अधिक उंच झाले. त्यामुळे एका प्लॅटफार्मवरुन दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्यासाठी तसेच तिकीट घराकडे जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांना विशेषत: वृद्ध प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. रेल्वे प्रशासनाकडे पादचारी मार्ग व उड्डाणपूल तयार करण्याची मागणी केली होती.मात्र अद्यापही कामाला सुरूवात झाली नाही.
- अनिरुद्ध शहारे,
सरपंच ग्रामपंचायत नवेगावबांध
..............................
उड्डाणपुलाचे काम सुरु आहे ते लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रवाशांना जेवढ्या चांगल्या सुविधा देता येतील त्या देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाचा आहे.
- रामदेव उरॉव,
स्टेशन मास्टर देवलगाव रेल्वे स्टेशन