फटाके उडविण्यापेक्षा दिवाळीत शौचालय तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:40 AM2017-10-13T00:40:56+5:302017-10-13T00:41:06+5:30
अपघात झाल्यास, आजारी पडल्यास पैसा नाही म्हणून उपचार थांबविले जात नाही. प्राधान्यक्रम ठरवून आपण पैसा खर्च करतो. शौचालय केवळ एका व्यक्तीच्या सोयीनेच नव्हे तर संबंध गावाच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अपघात झाल्यास, आजारी पडल्यास पैसा नाही म्हणून उपचार थांबविले जात नाही. प्राधान्यक्रम ठरवून आपण पैसा खर्च करतो. शौचालय केवळ एका व्यक्तीच्या सोयीनेच नव्हे तर संबंध गावाच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे या दिवाळीत पटाखे उडविण्यापेक्षा घरात शौचालय तयार करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच. ठाकरे यांनी केले.
तिरोडा तालुक्यातील बेरडीपार (काचेवानी) येथे गुरूवारी (दि.१२) पहाटे ५ वाजता गुडमॉर्निंग पथक अभियान राबविण्यात आले. त्यावेळी ग्रामपंचायत सभागृहातील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.डी. मुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जावेदखान इनामदार, अर्जुनी-मोरगावचे गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार, देवरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर, सालेकसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए.एल. खाडे, आमगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.एन. पांडे, गोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गोंदिया पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन पानघरे, सरपंच ज्योत्स्ना टेंभेकर, गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गोंदिया पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन पानघरे, उपसरपंच ज्ञानेश्वर कटरे, ग्रामपंचायत सदस्य जयकुमार रिनाईत उपस्थित होते.
जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस पडला. त्यातही तिरोडा तालुक्यात पावसाचे प्रमाण जिल्ह्यातून सर्वात कमी आहे.
उपलब्ध पाणी वाहून गेले तर पिण्याच्या पाण्याची समस्यासुध्दा निर्माण होऊ शकते. पाण्याच्या स्त्रोतांच्या बळकटीकरणावर अधिक लक्ष देण्याची गरज असून वनराई बंधाºयाच्या निर्मितीकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच. ठाकरे यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत तिरोडा तालुक्यात गुडमॉर्निंग पथकासह हागणदारीमुक्तीत सातत्य ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचे कौतुक करुन जिल्ह्यातील इतरही तालुक्यांनी तिरोडा तालुक्याप्रमाणेच कार्य करावे, असेही आर.एच. ठाकरे म्हणाले.
पहाटे ५ वाजता सुमारे दीडशे अधिकारी कर्मचाºयांचा ताफा बेरडीपार (काचेवानी) या गावात पोहोचल्यानंतर त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली. गावातील चारही बाजूकडे प्रत्येक गटाने भेट दिली.
याप्रसंगी संपूर्ण गावात गृहभेटी करण्यात आल्या. यात शौचालय नसलेल्या कुटुंबांना प्रबोधन करण्यात आले. यात खुशरंग ठाकरे, जयंद्र बिसेन, रामदास बिसेन, हौसीलाल बिसेन यांनी शौचालयाचे बांधकाम करण्याची तयारी दर्शविली.
गावात होणार ६४० शोषखड्डे
तिरोडा तालुक्यातील कुल्पा, नवेझरी या ग्रामपंचायतीत शंभर टक्के शोषखड्डे तयार करण्यात आले. त्याच धर्तीवर बेरडीपार (काचेवानी) गाव डासमुक्त करण्यासाठी गावात सुमारे ६४० शोषखड्डे तयार करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी जावेदखान इनामदार यांनी सांगितले. दरम्यान शोषखड्यांच्या निर्मितीला सुध्दा आजपासूनच सुरुवात करण्यात आली. शाळेत आॅक्सीजन पार्क, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शौचालयांचे सर्व्हेक्षण तसेच वनराई बंधाºयांच्या निर्मितीवर भर देवून तिरोडा तालुका खºया अर्थाने हागणदारीमुक्त करण्याचा मानसही याप्रसंगी गटविकास अधिकारी इनामदार यांनी व्यक्त केला.