क्रेडिट कार्डवर लोन काढायचे अन् गंडवायचे, टोळीला अटक; आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेलची कारवाई
By नरेश रहिले | Published: December 8, 2023 07:33 PM2023-12-08T19:33:15+5:302023-12-08T19:33:30+5:30
होमगार्डची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक
गोंदिया: क्रेडिट कार्डवर लोन मिळवून देण्याच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून ७ लाखांचे लोन घेऊन ७० टक्के रक्कम आपल्या खात्यावर वळवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेलने केला आहे. या प्रकरणात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ७ डिसेंबर रोजी करण्यात आली.
सडक-अर्जुनी तालुक्यातील खाडीपार येथील होमगार्ड धनराज पुंडलिक सयाम (३०) यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये क्रेडिट कार्डवर ७ लाख रुपयांचे लोन मिळवून देण्यासाठी त्यांच्या नावाने बनावट कागदपत्र तयार केले. त्यांच्या नावावर ७ लाखांचे लोन मंजूर झाले असताना आरोपींनी त्यांच्या अकाउंटवर फक्त २ लाख ३७ हजार रुपये एवढीच रक्कम जमा केली. उर्वरित ४ लाख ६३ हजार रुपये त्यांच्या संमतीशिवाय इतर ठिकाणी वर्ग केली. त्यांच्याबरोबर इतर लोकांचीही फसवणूक केली आहे. याप्रकरणी डुग्गीपार पोलिस ठाण्यात आरोपींवर भादंविच्या कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता व क्रेडिट कार्डच्या नावावर जिल्ह्यातील लोकांची मोठ्या प्रमाणावर झालेली आर्थिक फसवणूक पाहता गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ जेरबंद करण्याचे निर्देश दिले. पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहायक पोलिस निरीक्षक किरण पावसे, पोलिस उपनिरीक्षक चावके, पोलिस हवालदार विठ्ठल ठाकरे, रंजित बिसेन, खेमचंद बिसेन, हंसराज भांडारकर, अतुल कोल्हटकर, योगेश रहिले, चालक घनश्याम कुंभलवार यांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली.
आरोपींमध्ये यांचा समावेश
सिद्धांत चव्हाण (३०), रा. खाडीपार, प्रवीण पाटील (२७), रा. देवरी, कैलाश भोयर (३५), रा. चोपा, निखिलकुमार कोसले (२५), विक्कीसिंग कोसले (२३), नीलेश सुन्हारे (२०), तिन्ही रा. रायपूर व कैलाश भोयर (३५) यांच्यासह इतर साथीदार यांचा समावेश आहे.
आरोपींना नागपुरातून केली अटक
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता व क्रेडिट कार्डच्या नावावर जिल्ह्यातील लोकांची मोठ्या प्रमाणावर झालेली आर्थिक फसवणूक पाहता आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल यांनी स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल व नक्षल सेल येथील पोलिस अधिकारी अंमलदारांची पथके तयार केली होती. त्या आरोपींना नागपूरवरून ताब्यात घेण्यात आले.
अनेकांची फसवणूक केल्याची दिली कबुली
अटक करण्यात आलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी क्रेडिट कार्डद्वारे लोन मिळवून देण्याच्या नावावर बऱ्याच लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली असल्याचे सांगितले आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा गोंदियाचे पथक करीत आहे.