घरकुल गेले चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:00:14+5:30
ब्राम्हणटोला येथील रहिवासी नरहरी फुंडे यांना प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले. २०१७-१८ च्या ऑनलाईन यादीत त्यांचे नाव आहे.पंचायत समिती कार्यालयातर्फे त्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले नाही.घरकुल मंजुरीचे पत्र मिळाले नाही म्हणून त्यांनी फाईल कार्यालयाकडे सादर केली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : घरकुल चोरीला जाऊ शकते ! विश्वास बसत नाही ना? पण हे अगदी खरे आहे.बाराभाटी ग्रामपंचायत अंतर्गत ब्राम्हणटोला येथील नरहरी केवळराम फुंडे यांचे घरकुल चोरीला गेले आहे.चोरीची अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार झाली नाही. मात्र हे घरकुल कुणी पळविले या चमत्काराचा शोध पंचायत समिती घेत आहे.
ब्राम्हणटोला येथील रहिवासी नरहरी फुंडे यांना प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले. २०१७-१८ च्या ऑनलाईन यादीत त्यांचे नाव आहे.पंचायत समिती कार्यालयातर्फे त्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले नाही.घरकुल मंजुरीचे पत्र मिळाले नाही म्हणून त्यांनी फाईल कार्यालयाकडे सादर केली नाही.वर्षभरापूर्वीपासून ते घरकुलची स्वप्नं रंगवीत आहेत.मात्र घरकुल मिळेना. घरकुलाचे काम ऑनलाइन झाले आहे. साधारण व्यक्तीलाही बघता येते. घराशेजारी कुणीतरी पाहुणा म्हणून आला. त्याला हे बघता येत होते. फुंडे यांनी सहज त्याला अद्याप घरकुल मिळाले नाही त्याची काय स्थिती आहे. ते बघण्यासाठी सांगितले.त्याने बघितले आणि आश्चर्याचा धक्काच बसला.आॅनलाइन प्रणालीत त्यांचे घरकुल तयार होऊन त्यांना १ लाख ३० हजार रु पये मिळाल्याचे दर्शविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र फुंडे यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही आणि घरकुलही झाले नाही. त्यांनी थेट पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधला. घडलेला प्रकार गटविकास अधिकारी यांना सांगितला. त्यांनी लेखी तक्र ार करण्यास सांगितले. तक्र ार करण्यात आली. गट विकास अधिकारी मयूर आंदेलवाड, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक चौधरी यांनी बुधवारी बाराभाटी येथे जाऊन चौकशी केली.फुंडे यांच्या बँक खात्यात पैसे जमा न होता हे पैसे राष्ट्रपाल माने यांच्या खात्यात जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पैशाची घरकुल प्रणालीच्या आॅनलाईन दस्तावेजात फुंडे यांचे नावे नोंद झाली आहे.हा अफलातून चमत्कार आहे. कसलाही कारभार केला नसतांना फुंडे यांचे नावे एकदा नोंद झाल्यामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही. अभियंत्यांच्या चुकीमुळे या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ त्यांचेवर आली आहे. इतर घरकुलातही आणखी घबाड असण्याची शक्यता नाकारता येत नाही.अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत सर्वच घरकुलांची विशेष यंत्रणेमार्फत चौकशी करणे गरजेचे आहे.
अभियंत्यांचा कंत्राट संपला
घरकुल योजनेच्या कामासाठी खासगी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक पंचायत समिती कार्यालयात कंत्राटी अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे.या प्रकरणात कंत्राटी अभियंता कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.मात्र या अभियंत्यांचा कंत्राट सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच संपला आहे.त्यामुळे यासाठी कुणाला जबाबदार धरले जाते हा प्रश्न ऐरणीवर आहे.