अवकाळीने रब्बी व भाजीपाला पिकांवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:28 AM2021-03-20T04:28:02+5:302021-03-20T04:28:02+5:30
गोंदिया : जिल्ह्यात गुरुवारपासून ढगाळ वातावरण असून, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात सर्वत्र तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे याचा फारसा ...
गोंदिया : जिल्ह्यात गुरुवारपासून ढगाळ वातावरण असून, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात सर्वत्र तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे याचा फारसा रब्बी हंगामातील आणि उन्हाळी पिकांना फटका बसला नाही. मात्र हवामान विभागाने २१ मार्चपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली होती. यापैकी गहू, हरभरा पिकांची बऱ्याच प्रमाणात मळणी सुध्दा झाली आहे. तर काही प्रमाणात मळणी होणे बाकी आहे. तर काही शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाची सुद्धा लागवड केली आहे. तर मागील वर्षीपासून जिल्ह्यातील जवळपास ७०० एकरवर मका पिकाची लागवड केली जात आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि वादळाचा या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. शुक्रवारी जिल्ह्यात तुरळक स्वरूपात पाऊस झाल्याने त्याचा पिकांना फारसा फटका बसला नाही. मात्र २१ मार्चपर्यंत हवामान विभागाने अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. जोराचा पाऊस आणि गारपीट झाल्यास रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
.........