पीकविमा कंपन्या मालामाल, भरले १६ कोटी, मिळणार ६२ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:28 AM2021-05-23T04:28:25+5:302021-05-23T04:28:25+5:30
गोंदिया : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी दरवर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा ...
गोंदिया : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी दरवर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा काढतात. मात्र, मागील दोन वर्षांचा शेतकऱ्यांचा पीक विम्यासंदर्भातील अनुभव पाहता पीक विमा कंपन्या केवळ नावापुरत्याच ठरत आहेत. मागील वर्षी जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. विमा हप्तापोटी शेतकऱ्यांनी एकूण १६ कोटी ४८ लाख हजार रुपये भरले. मात्र, विमा कंपनीने केवळ ४३३३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी केवळ ६२ लाख रुपये दिले. जवळपास ५२ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले. त्यामुळे पीकविमा कंपन्याच मालामाल होत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीसुध्दा मोठ्या प्रमाणात शेतकरी पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते. विशेष म्हणजे गेल्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात धानपिकांचे नुकसान झाले. याचा अहवाल सुध्दा कृषी विभागाने शासनाकडे पाठविला होता. मात्र, यानंतर विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कुठल्या आधारावर पीक विमा मिळण्यापासून वंचित ठेवले ही बाब मात्र समजण्यापलीकडची आहे.
.........
५२ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित
मागील वर्षी जिल्ह्यातील एकूण ५६६४० शेतकऱ्यांनी २८९१५ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला होता. पीक विम्याच्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी २ कोटी २० लाख, केंद्र सरकारने ७ कोटी १४ लाख, राज्य सरकारने ७ कोटी १४ लाख असे एकूण १६ काेटी ४८ लाख रुपये भरले होते. मात्र, विमा कंपनीने यापैकी केवळ ४३३३ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवित ६२ लाख रुपयांचा परतावा दिला. तर तब्बल ५२ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यापासून वंचित ठेवले. या शेतकऱ्यांना पीक विमा न देण्यामागील कारण मात्र विमा कंपन्यांनी स्पष्ट केले नाही.
.........
विमा भरूनही नुकसान नाही
गेल्या खरीप हंगामात मी माझ्या अडीच हेक्टरमधील धान पिकाचा पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा काढला होता. त्यातच परतीच्या पावसाने नुकसान होऊन देखील विमा कंपनीकडून कुठलीच नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे पीक विमा केवळ नावापुरताच ठरत आहे.
- पुरुषोत्तम वानखेडे, शेतकरी
......
मी दरवर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा काढतो. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून पिकांचे सातत्याने नुकसान होत आहे. विमा कंपनीकडून एकाही वर्षी परतावा मिळाला नाही. हीच परिस्थिती यंदा देखील आहे. त्यामुळे पीक विमा काढायचा की नाही या विचारात मी आहे.
- अविनाश काशिवार, शेतकरी
.....
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी दरवर्षी पीक विमा काढतात. मात्र, आजवरचा अनुभव पाहता पीक विम्याचा लाभ हा केवळ विमा कंपन्यानाच होत आहे.
- निहारीलाल दमाहे, शेतकरी
...........
खरीप-हंगाम २०-२१
पीक विमाचे एकूण लागवड क्षेत्र : २८९१४
एकूण जमा रक्कम : १६ कोटी ४८ लाख
..................
एकूण मंजूर पीक विमा : ६२ लाख रुपये
प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम : २ कोटी २० लाख रुपये
राज्य सरकारने भरलेली पीक विम्याची रक्कम : ७ कोटी १४ लाख
केंद्र सरकारने भरलेली पीक विम्याची रक्कम : ७ कोटी १४ लाख
विमा काढणारे एकूण शेतकरी : ५६६४०
लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या : ४३३३
किती जणांना मिळाला लाभ : ४३३३
किती शेतकऱ्यांना वाटप केली रक्कम : ०