गोंदियामध्ये २७७ हेक्टरमधील पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 05:20 PM2024-05-07T17:20:33+5:302024-05-07T17:21:42+5:30
अवकाळी पावसाचा फटका : नुकसानभरपाईसाठी ७७ लाख ७६ हजार ५४० रुपयांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात १ ते ३० एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील धान, भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेने केले होते. यात जिल्ह्यातील एकूण २७७.०५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून, ६५२ शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ७७ लाख ७६ हजार ५४० रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय नुकसानीची आकडेवारी
तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र हेक्टर अपेक्षित निधी
गोंदिया २६१ ११४.१९ ३१६६७४०
गोरेगाव ५४ २८.५० ७७५८००
तिरोडा १०१ ४७.२० १३१०४००
अर्जुनी मो. ६७ १३.६५ ३७२१५०
देवरी ०१ ०.३० १०८००
आमगाव ९९ ४०.२० १२०७८००
सालेकसा १३ ५.६२ १९३३२०
सडक अ. ५६ २७.३९ ७३९५३०
एकूण ६५२ २७७,०५ ७७७६५४०
जिल्ह्यात खरिपासह रब्बी पिकांची लागवड केली जात आहे. मात्र, यंदा अवकाळी पाऊस वांरवार हजेरी लावत असल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. १ ते ३० एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाने तीन ते चार वेळा हजेरी लावली. याचा धानासह मका, भाजीपाला व फळपिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले. यानंतर नुकसानीचा अंतिम अहवाल सोमवारी (दि. ६) सादर करण्यात आला. त्यात जिल्ह्यातील २७७.०५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून, यामुळे ६५२ शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ७७ लाख ७६ हजार ५४० रुपयांची मागणी केली आहे.
सर्वाधिक नुकसान गोंदिया तालुक्यात
अवकाळी पावसामुळे सर्वाधिक ११४.१९ हेक्टरचे नुकसान गोंदिया तालुक्यात झाले असून, यामुळे २६१ शेतकरी बाधित झाले आहेत. आमगाव तालुक्यात ४० हेक्टर आणि तिरोडा तालुक्यात ४७.२० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.