मृगाच्या पावसावर धानपिकाचे नियोजन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:35+5:302021-06-17T04:20:35+5:30
पावसाळ्यातील एकूण नक्षत्र नऊ असतात त्यातील मृग नक्षत्रासह पाच नक्षत्रात नियमित पाऊस झाला तर भरपूर धानाचे उत्पन्न होत असते. ...
पावसाळ्यातील एकूण नक्षत्र नऊ असतात त्यातील मृग नक्षत्रासह पाच नक्षत्रात नियमित पाऊस झाला तर भरपूर धानाचे उत्पन्न होत असते. दरवर्षी मृग नक्षत्र बहुतांश कोरडाच जातो. मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्याचे अनुभव शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे धान पिकाचे गणित बिघडत आले आहे. बदलत्या हवामानाचा फटका दरवर्षी शेतकरी सहन करीत आला आहे. हे काही शेतकऱ्यांसाठी नवीन नाही. मृग नक्षत्राच्या पूर्वी या परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृग नक्षत्र लागण्यापूर्वीच शेतीची मशागत आटोपली होती. यावर्षी मृग नक्षत्राचा पाऊस पहिल्या दिवशी पासून सुरु झाल्यामुळे हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज पूर्णपणे खरा ठरल्याने शेतकऱ्यांचा हवामान खात्यावरील विश्वास वाढला आहे. तसेच यावर्षीच्या मृग नक्षत्राचे वाहन गाढव असून गाढव हे वाहन असल्यास ज्या प्रमाणे गाढव ओरडत असतो. यावरुन गर्जनेसह पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांची धारणा असून या वर्षीच्या खरीप हंगामातील धानाचे उत्पन्न चांगले येईल अशी आशा व्यक्त करीत आहेत.