तालुक्यात पीक उत्पादकता वाढ मोहिमेला सुरुवात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:29 AM2021-05-26T04:29:50+5:302021-05-26T04:29:50+5:30
गोंदिया : शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन पीक उत्पादनात वाढ व्हावी यादृष्टीने येत्या खरीत हंगामात पीक उत्पादकता वाढ मोहीम ...
गोंदिया : शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन पीक उत्पादनात वाढ व्हावी यादृष्टीने
येत्या खरीत हंगामात पीक उत्पादकता वाढ मोहीम कृषी विभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. या
मोहिमेंतर्गत बियाणे उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, ॲझोला उत्पादन, तसेच १० टक्के रासायनिक
खतांच्या वापरात बचत करणे या बाबींवर मोहीम राबविण्यात येत आहे.
त्यानुसार शुक्रवारी (दि.२१) तालुक्यातील ग्राम अदासी, खमारी, दतोरा, जगनटोला, दवनीवाडा, कासा, चुटिया, रापेवाडा, पिंडकेपार, मुंडीपार खु., सिरपूर, आंभोरा, दासगाव खु., गिरोला आदी गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेंतर्गत बियाणे उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, ॲझोला उत्पादन, तसेच १० टक्के
रासायनिक खतांच्या वापरात बचत करणे याबाबतचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कृषी विभागातील क्षेत्रिय
अधिकारी व कर्मचारी यांच्याद्वारे दिले जात आहे. पीक उत्पादनात वाढ व्हावी म्हणून बियाणे उगवण
क्षमता प्रात्यक्षिकाने शेतकऱ्यांना बियाणांचा दर्जा कळणार आहे व त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट
येणार नाही, तसेच बियाणास बीजप्रक्रिया केल्यास पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता
कमी होणार आहे.
रासायनिक खतांचा वाढत असलेला बेसुमार वापर यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे व
उत्पादन खर्चही वाढत चालला आहे. हा सर्व खर्च कमी व्हावा या उद्देशाने रासायनिक खतांची १० टक्के
बचत कशी करता येईल, याचे सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर नत्रयुक्त रासायनिक खतांचा
वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना ॲझोलाचे उत्पादन वाढविण्याकरिता या मोहिमेतून मार्गदर्शन करण्यात येत
आहे.
या मोहिमेत जमीन आरोग्य पत्रिकेच्या आधारे शिफारस केलेली खते वापरण्यास प्रोत्साहन दिले जात
असून, त्यामुळे गरज नसलेल्या खतांचा वापर होणार नाही, तसेच शेतकऱ्यांना अनावश्यक खतांवर खर्च कमी
करता येईल. या कार्यक्रमात उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी
धनराज तुमडाम, तसेच कृषी विभागातील इतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येत
शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.