पस्तिशी ओलांडली, तरी नवरी मिळेना नवऱ्याला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 05:38 PM2021-09-30T17:38:53+5:302021-09-30T17:39:46+5:30
कोरोनाच्या काळात अनेक तरुण बेरोजगार झाले. नोकरीसाठी जागाच निघाल्या नाहीत. बेरोजगारांची फौज तयार झाल्याने बेरोजगार मुलांना मुलगी कशी देणार हा प्रश्न मुलीचे आई-वडील करीत आहेत.
गोंदिया : कमविणारा मुलगा, देखणा मुलगा, शहरात राहणारा आणि छोटे कुटुंब असलेला मुलगा आजघडीला मुलींना हवा आहे. आधी शिक्षण घेऊन नोकरीच्या नादात वेळ घालविणाऱ्या नवऱ्या मुलाने पस्तिशी ओलांडली तरी त्याला स्वत:च्याच जेवणाचे वांदे आहेत. अशा मुलांना नवरी मिळत नाही.
लग्नगाठी मुलाची आर्थिक मिळकत पाहूनच बांधल्या जातात. परंतु कोरोनाच्या काळात अनेक तरुण बेरोजगार झाले. नोकरीसाठी जागाच निघाल्या नाहीत. बेरोजगारांची फौज तयार झाल्याने बेरोजगार मुलांना मुलगी कशी देणार हा प्रश्न मुलीचे आई-वडील करीत आहेत.
पुरुषप्रधान संस्कृतीमुळे भारतात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान, शिक्षण व रोजगाराच्या समान संधीमुळे मुलांप्रमाणेच मुलीदेखील उच्चशिक्षित आणि कमावत्या झाल्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होत नाही. त्या जॉबच्या शोधात जातात. कोरोनाच्या काळात मुलांना जॉब नसल्याने त्यांचे वय वाढत आहे. पस्तिशी ओलांडलेली मुले लग्न करण्यासाठी नवरीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतात. परंतु त्यांना मुली द्यायला मुलीचे वडील तयार नाहीत.
एकत्रित कुटुंबामध्ये नको गं बाई
आजघडीला संयुक्त कुटुंब पद्धती नाहीशीच झाल्यासारखी आहे. छोटे कुटुंब मुली पसंत करीत आहेत. नवरा शहरातील आणि कुटुंब छोटे किंवा त्याहूनही पुढे म्हणजे मी आणि माझा नवराच नोकरीच्या ठिकाणी राहू अशी समज अनेक मुलींची व तिच्या पालकांची असल्याने लग्न गाठी होत नाहीत.
लग्न लांबले कारण...
- मुलगा सुंदर, सुशील, नोकरीवाला असावा असे मुलींना वाटते. तर मुलाला आधी चांगली नोकरी किंवा जॉब असावा असे वाटते.
-पाच आकडी पगार असलेला नवराच बरा अशी मुलींची समज झाल्याने वयात येणाऱ्या मुलाला नोकरी अभावी मुली मिळत नाही.
शेतकरी मुलाचे तर आणखीणच कठीण
शेती करणाऱ्या मुलाला कुणीच मुलगी द्यायला तयार नाही. वावर आहे तर पाॅवर आहे असे फक्त पोकळच म्हटले जाते. शेतीत राबण्याची कोणत्याही मुलीची इच्छा नसल्यामुळे शेती करणाऱ्या मुलाला मुलगी मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात.
तरुण काय म्हणतात..
१) आम्ही शिक्षण घेतले. परंतु सरकारने रिक्त जागा भरल्याच नाहीत. त्यामुळे नोकरी मिळाली नाही. वाढते वय पाहून व्यवसायाकडे वळलो. परंतु व्यवसायाकडे पाहण्याचा नवऱ्या मुलीच्या वडिलाचा दृष्टीकोन हीन आहे. त्यामुळे नोकरीच्या नादात अडकलेल्या मुलांची वये वाढत आहेत. परंतु हे समाजस्वास्थासाठी चूक आहे.
सचिन तलमले, तरुण, पदमपूर
२) मुलीचे शिक्षण नसतानाही प्रत्येक मुलगी नोकरीवालाच नवरा मिळावा अशी अपेक्षा करते. आपल्या अपेक्षेनुरूप नवरा शाेधला तर ते योग्य. परंतु मुलीचे शिक्षण, नोकरी नसताना नुसता नोकरीवालाच मुलगा हवा ही अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे. यातून समाजाची घडली विस्कटत आहे.
- हिमालय राऊत, पोवारीटोला (पदमपूर)
तरुणी काय म्हणतात?
१) आम्ही शिक्षण घेतले. ज्याच्या घरी जाणार तो व्यक्ती कमविता तरी असावा. त्याने आपल्याला सुखात ठेवावे ही प्रत्येक मुलीची अपेक्षा असते. ही मुलींची अपेक्षा कुठे चूक आहे. मुलीच्या वडिलांनी कवडीही कमवित नसणाऱ्या मुलाच्या हातात मुलगी द्यावी काय?
- एक तरुणी, गोंदिया.
२) आई-वडील लहानपणापासून मुलीचा सांभाळ करून तिचे शिक्षण करून विवाहयोग्य झाल्यावर योग्य वर शोधण्याचा प्रयत्न करतात. ते प्रत्येक मुलीच्या आईवडिलांनी करणे योग्यच आहे. परंतु न कमविणाऱ्या मुलाच्या हातात कोणते वडील आपल्या मुलीला सोपवून आपलाच त्रास वाढवून घेतील.
- एक तरुणी, सडक-अर्जुनी