कचारगडला भाविकांची अलोट गर्दी

By admin | Published: February 22, 2016 01:53 AM2016-02-22T01:53:26+5:302016-02-22T01:53:26+5:30

कचारगड यात्रेनिमित्त कोया पुनेम महोत्सव आणि बडावेद पूजेनिमित्त रविवारी (दि.२१) दुसऱ्या दिवशी आदिवासी भाविकांची अलोट गर्दी दिसून आली.

The crowd of devotees of Kutchgad | कचारगडला भाविकांची अलोट गर्दी

कचारगडला भाविकांची अलोट गर्दी

Next

धनेगाव परिसर रंगले पिवळ्या रंगात: ध्वजारोहणानंतर रॅलीने दुमदुमले कचारगड
सालेकसा : कचारगड यात्रेनिमित्त कोया पुनेम महोत्सव आणि बडावेद पूजेनिमित्त रविवारी (दि.२१) दुसऱ्या दिवशी आदिवासी भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. अनेक राज्यातून आलेल्या भाविकांची संख्या आज लाखोंच्या घरात पोहोचली असून स्त्री, पुरुष, वृद्धांसह सर्व आपल्या धार्मिक भावनेत रमलेले असून कचारगडच्या दिशेने जाणे-येणे या क्रमात कोणतीही पर्वा व चिंता न करता ‘जय सेवा, जय परसापेन, जय जंगो, जय लिंगो’ चा जयघोष करीत असताना दिसून आले.
सकाळी दोन्ही दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन दर्रेकसा रेल्वे स्टेशनवर थांबताच हजारोंच्या संख्येने भाविक आपल्या-आपल्या क्षेत्रातील गोंडी ध्वज हाती घेऊन वाद्य वाजवित धनेगावकडे जाऊ लागले. आदिवासी समाजातील अनेक वरिष्ठ अधिकारी- पदाधिकारी परराज्यातून स्वत:च्या चारचाकी वाहनाने धनेगाव येथे पोहोचले. धनेगाव परिसरात हजारो चारचाकी वाहने व अनेक बसेस उभ्या असल्याचेही दिसून आले. दुचाकीवाहने सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसत होते. धनेगावच्या चारही दिशेने रस्त्यावरुन भाविक येतांना दिसत होते.
सकाळी ९ वाजचा आमदार संजय पुराम कार्यक्रमस्थळी दाखल होताच निश्चित कार्यक्रमाला सुरुवात झाली. आदिवासी भुमकस (पूजारी) यांच्या पूजनविधीसह सर्वांनी पिवळ्या रंगाचा फेटा एकमेकांना बांधला. एकमेकांना पिवळा दुपट्टा घातला व आलींगन दिले. संपूर्ण धनेगाव परिसर सकाळपासून पिवळ्या रंगात रंगून गेलेला होता. भाविक दुकानांतून सुद्धा पिवळे दुपट्टे मोठ्या प्रमाणात विकत घेताना दिसून येत होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
धनेगाव कचारगडचा परिसर संवेदनशील असून याठिकाणी आज मंत्र्याचे आगमन होणार असल्याने संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. कचारगडकडे जाणाऱ्या मार्गावर जंगो लिंगो घाटावर पोलिसांचा कडक पहारा होता व प्रत्येक भाविकांवर व इतर येणाऱ्या जाणाऱ्यांवर पोलिसांची नजर होती. पोलिस विभागाचे अनेक जवान व अधिकारी धनेगाव ते कचारगडपर्यंत कोणी गणवेशात तर कोणी सर्वसामान्य वेषात आपले कर्तव्य बजावत होते. तसेच श्वानपथक सुद्धा लावण्यात आले होते. सकाळी गोंडी ध्वज राजे वासुदेवशाह टेकाम यांच्या हस्ते फडकविल्यानंतर गोंडी रॅली व बाबा शंभूशेषची पालखी काढण्यात आली. कचारगडला महापूजा करण्यासाठी प्रस्थान करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार अशोक नेते, आमदार संजय पुराम, यवतमाळचे आमदार राजू तोडसाम यांनी रानी दुर्गावती व आदिशक्तीचे प्रेरणास्त्रोत मोतीराम कंगाली यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करुन पूजा केली व श्रद्धा सूमन अर्पित केले. (तालुका प्रतिनिधी)

तालुका व जिल्हा प्रशासन सतत सेवेत
तालुका व जिल्हा प्रशासनाच्यावतीने धनेगाव ते कचारगड पर्यंत आवश्यक त्या ठिकाणी एकूण आठ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच भाविकांसाठी ठिकठिकाणी आरोग्य सेवा, ठंड पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. एसटीच्या बसेस दिवसभर कचारगड येता-जाता दिसून येत होत्या. परंतू दरेकसा येथे कोणतीही एक्स्प्रेस गाडी रविवारी थांबताना दिसली नाही. याबद्दल भाविकांमध्ये थोडा आक्र ोश दिसून आला.

Web Title: The crowd of devotees of Kutchgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.