प्रतापगडावर भक्तांची अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 09:38 PM2019-03-04T21:38:01+5:302019-03-04T21:38:33+5:30

हातात त्रिशूल आणि मुखात हर बोला हरहर महादेव.. चा गजर करीत सोमवारी (दि.४) सुमारे पाच लाख भाविकांनी महादेव तर मुस्लीम बांधवानी ख्वाजा उस्मान गणी हारुनी बांबाचे दर्ग्यावर दर्शन केले. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगड या ऐतिहासीक व धार्मिक तीर्थस्थळी दर्शनासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी येथे अलोट गर्दी केली होती.

The crowd of devotees on Pratapgad | प्रतापगडावर भक्तांची अलोट गर्दी

प्रतापगडावर भक्तांची अलोट गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्दे‘हर बोला हर हर महादेव’चा गजर : पाच लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन, ठिकठिकाणी महाप्रसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : हातात त्रिशूल आणि मुखात हर बोला हरहर महादेव.. चा गजर करीत सोमवारी (दि.४) सुमारे पाच लाख भाविकांनी महादेव तर मुस्लीम बांधवानी ख्वाजा उस्मान गणी हारुनी बांबाचे दर्ग्यावर दर्शन केले. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या प्रतापगड या ऐतिहासीक व धार्मिक तीर्थस्थळी दर्शनासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी येथे अलोट गर्दी केली होती.
मांगल्य जपणारा, आनंद देणारा व बंधूभाव वाढविणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाला येथे अत्याधिक महत्व व श्रध्दांचे स्थान आहे. लांब अंतरावरील भाविक रविवार सुट्टीचा दिवस असल्याने रविवारपासूनच येथे डेरेदाखल झाले. हल्ली साधनांची संख्या अमाप वाढल्याने आपापल्या साधनाचे जत्थेचे जत्थे येथे डेरेदाखल झाले होते. महाप्रसाद वितरणाच्या नावावर राजकीय नेत्यांची मांदीयाळी येथे दिसून आली. विविध ठिकाणी त्यांचे महाप्रसाद वितरणाचे स्टॉल लावण्यात आले होते. सोमवार हा भोलेशंकराचा दिवस असल्याने भल्या पहाटेपासूनच भक्तजणांच्या गर्दीने प्रतापगड फुलले होते. सकाळी ११ नंतर भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असल्याने भाविकांचे आवागमन सायंकाळपर्यंत सुरुच होते. यात्राकाळात प्रशासनातर्फे वीज सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने रात्री सुध्दा भाविक दर्शन घेतांना दिसून येत होते. महाशिवरात्री यावर्षी सोमवारी आल्याने प्रतापगड भाविकांनी फुलणार याची प्रचिती प्रशासनाला आल्याने गर्दी उसळणार असे भाकित करण्यात येत होते. त्यादृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रास्थळी वाहतुकीवर निर्बंध घातल्याने गावात वाहनांची गर्दी कमी झाली होती. गाव सीमेच्या दोन किमी अंतरावर वाहतूक अडविण्यात आली होती. त्यामुळे यात्रेकरुंना सोईचे झाले मात्र भाविकांना बरेच अंतर पायपीट करावी लागली.
पंचायत समितीच्या वतीने कचरा नियंत्रण व ठिकठिकाणी मुताऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्य विभागाच्या वतीने सात ठिकाणी भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत यांचे देखरेखीखाली आरोग्य तपासणी व उपचार केंद्र उघडण्यात आले होते. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने साकोली, गोंदिया, तुमसर, तिरोडा, भंडारा व पवनी आगारातून बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. आग नियंत्रणाचे दृष्टीने नगर परिषद गोंदिया व तिरोडा येथील अग्नीश्मन दल तैनात होते. भक्तजणांच्या पेयजल व्यवस्थेसाठी ठिकठिकाणी प्याऊ व नळयोजनेद्वारे पाण्याची सुविधा उपलब्ध केली होती. तालुका प्रशासनाचे वतीने गैरकृत्यावर देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. विशेष म्हणजे यावेळी ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण कमी होते. यार्षी विविध दुर्धर आजाराच्या तपासणीसाठी अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यात कर्करोग, हृदयरोग, मधूमेह, मोतीबिंदू, किडनी आजार व मेंदू रोग आजाराची तपासणी करण्यात आली.यावर्षी सशस्त्र पोलीस दल गोठणगाव यांचेतर्फे भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरातील ४० स्वयंसेवकांनी श्रमदान केले. विविध स्वयंसेवी संघटनाचे वतीने अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध व प्रतापगड येथे प्याऊ व महाप्रसाद वितरण करण्यात आले.
मुस्लीम बांधवांचीही गर्दी
मुस्लीम बांधवांनी ख्वाजा उस्मान गनी हारुनी यांचे दर्ग्यावर दर्शनासाठी रिघ लावली होती. महाशिवरात्रीचे दिवशी काही हिंदू बांधव दर्ग्यावर तर मुस्लीम बांधव महादेवाचे दर्शंन घेत असल्याचे दृश्य येथे पहायला मिळते. यावरुन हिंदू-मुस्लीम ऐक्य भावनेच्या मनोमिलनाची येथे प्रचिती येते. महाशिवरात्री पर्वावर किल्यावर चढून या स्थळांच्या ऐतिहासीक स्थळाची पाहणी करतात. एरवी महादेव पहाडी व किल्याची पाहणी करण्यासाठी अगदी तुरळक भक्तजन जातात.
चोख बंदोबस्त आणि सुविधा
पोलीस प्रशासनाच्या वतीने कालीमाती-प्रतापगड, कढोली-प्रतापगड व तिबेट कॅम्प प्रतापगड मार्गावर गावाच्या सीमेबाहेर सुमारे २-३ किमी अंतरावर वाहने थांबविण्यात आल्याने भाविकांची थोडीफार गैरसोय झाली. मात्र सुरक्षिततेच्या व यात्रास्थळी वाहनांची कमी प्रमाणात गर्दी करण्याचे दृष्टीने योग्य पाऊल होते.

Web Title: The crowd of devotees on Pratapgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.