सेंद्रीय शेतीची शेतकऱ्यांना पडतेय भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:05 PM2017-11-20T22:05:59+5:302017-11-20T22:07:41+5:30
रासायनिक खतांचा वाढता वापर आणि संकरीत बियाणांमुळे शेतीच्या लागवड खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
नरेश रहिले।
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : रासायनिक खतांचा वाढता वापर आणि संकरीत बियाणांमुळे शेतीच्या लागवड खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र त्यातुलनेत हाती येणारे उत्पादन फार कमी असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. शिवाय रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. यासर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरण पूरक सेंद्रीय शेतीचा पर्याय पुढे येत आहे. या शेतीचे महत्त्व शेतकºयांना पटू लागल्याने जिल्ह्यातील १ हजार शेतकºयांनी या शेतीची कास धरल्याचे दिलासदायक चित्र आहे.
अधिक उत्पादन घेण्याच्या लालसेमुळे रासायनिक खतांचा अधिक वापर केला जात आहे. मात्र परिणामी जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. रासायनिक खते व किटकनाशकांच्या माध्यमातून घेतलेल्या पिकांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याची बाब एका सर्वेक्षणानंतर पुढे आली आहे. यासर्व प्रकाराला पायबंद लावण्यासाठी सेंद्रीय आणि नैसर्गिक शेती करण्याचे आवाहन केले जात आहे. ही बाब आता शेतकऱ्यांना सुध्दा पटू लागल्याने ते देखील सेंद्रीय शेतीच्या लागवडी वळू लागल्याचे चित्र आहे.
प्रकल्प संचालक आत्मा गोंदिया अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रीय शेती सन २०१६-१७ मध्ये गोंदिया जिल्ह्यात २० शेतकरी गट स्थापन करण्यात आले. या २० गटांमध्ये १ हजार शेतकºयांचा समावेश आहे.
या गटांना आत्माअंतर्गत प्रशिक्षण, शेतकरी सहल, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सेंद्रीय किटकनाशके, बुरशीनाशके, आणि सेंद्रीय खते यांचे युनिट उभारण्याकरीता साहित्य, उपकरणे आदीचे प्रशिक्षण दिले आहेत. शेतकºयांना पीजीएसमार्फत प्रमाणीकरण मिळण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. जेणेकरून शेतकºयांना उत्पादनाबाबत खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध होऊन आत्मविश्वास वाढेल, अशी सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.
सन २०१७-१८ ह्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा स्थितीत सेंद्रीय शेतीतील उत्पादीत धान शेतकऱ्यांना ४०० ते ४५० क्विंटल तांदूळ उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
सेंद्रीय शेतमालाबाबत जनजागृती
जिल्हाधिकारी व प्रकल्प संचालक कार्यालय गोंदिया अंतर्गत १० शासकीय कार्यालय व ६ वेगवेगळ्या सामाजिक संस्था, योगसंस्था व धार्मिक मंडळे यांना सेंद्रीय तांदूळ देण्यात आला. सेंद्रीय तांदळाचे महत्व व जमिनीच्या आरोग्याबाबत जागृकता निर्माण केली आहे. जिल्हाधिकाºयांच्या नाविण्यपूर्ण कार्यक्रमांमुळे गोंदिया जिल्ह्यात सेंद्रीय शेतीकडे शेतकºयांना वळविण्यास आणि सेंद्रीय शेतमालाबाबत जनजागृती करण्यास मदत होत आहे.
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री
सर्व शासकीय अधिकारी व व्यापारीगटामार्फत जिल्ह्याबाहेरून वेगवेगळ्या स्तरावरून सेंद्रीय तांदळाला मागणी येत आहे. सेंद्रीय तांदळाची चव चाखलेल्या ग्राहकांकडून प्रकल्प संचालकांना सेंद्रीय तांदळाची मागणी येत आहे. परंतु यावर्षी मागणीला उत्पादीत सेंद्रीय तांदूळ पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. प्रकल्प संचालक आत्मा यांच्यामार्फत प्रति ग्राहकाला कमीत कमी १० किलो व जास्तीत जास्त ५० किलो तांदूळ उपलब्ध केला जाईल. विशेष म्हणजे शेतकºयांच्या माध्यमातून थेट ग्राहकांना शेतमालाची विक्री केली जात असल्याने ग्राहकांचे चारपैसे वाचत असून शेतकºयांचे सुध्दा दलालांच्या घश्यात जाणाºया पैशाची बचत होत आहे.
२० गावातील शेतकऱ्यांचा पुढाकार
सेंद्रीय शेती करण्यासाठी पुढे आलेले १ हजार शेतकरी हे २० गावातील आहेत. गोंदिया तालुक्याच्या तीन गावातील १५० शेतकरी, तिरोडा तालुक्याच्या तीन गावातील १५० शेतकरी, अर्जुनी-मोरगावच्या तीन गावातील १५० शेतकरी, गोरेगावच्या तीन गावातील १५० शेतकरी, सालेकसा दोन गावातील १०० शेतकरी, आमगावच्या दोन गावातील १०० शेतकरी, देवरीच्या दोन गावातील १०० शेतकरी, सडक-अर्जुनीच्या दोन गावातील १०० शेतकरी मागील दोन वर्षापासून सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.
जिल्ह्यात शेतकऱ्यांचे ५१ गट
सेंद्रीय शेती करणारे शेतकºयांचे गट तयार करण्यात आले. आधीचे शेतकऱ्यांचे २० गट तयार करण्यात आले आहेत. सेंद्रीय शेतीला प्राधान्य देण्यासाठी पुन्हा जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांनी ३१ गट तयार करण्यात आले. जिल्ह्यात सेंद्रीय शेती करणारे सध्यास्थितीत ५१ गट आहेत.