विनाकारण चालानवर अंकुश लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:42 AM2018-10-13T00:42:21+5:302018-10-13T00:42:55+5:30
वाहतूक नियंत्रण शाखेकडून काळी-पिवळी व आॅटोंवर विनाकारण चालान केले जात आहे. यावर अंकुश लावण्यात यावे, अशी मागणी काळी-पिवळी टॅक्सी व आॅटो चालक संघटनेने केली असून आमदार गोपालदास अग्रवाल यांना मागण्यांचे निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वाहतूक नियंत्रण शाखेकडून काळी-पिवळी व आॅटोंवर विनाकारण चालान केले जात आहे. यावर अंकुश लावण्यात यावे, अशी मागणी काळी-पिवळी टॅक्सी व आॅटो चालक संघटनेने केली असून आमदार गोपालदास अग्रवाल यांना मागण्यांचे निवेदन दिले.
संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, बहुतांश काळी-पिवळी व आॅटोचालक सुशिक्षित व बेरोजगार असून कशी बशी पैशांची व्यवस्था करून काळी-पिवळी व आॅटो खरेदी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. असे असताना मात्र, वाहतूक नियंत्रण शाखेने अचानक एकाच मार्गावर २०-२५ वाहनांना विनाकारण चालान करून तंग करण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे सर्वच वाहन चालक दहशतीत असून मानसिक तणावात असल्याने अपघातांची शक्यता बळावली आहे.
विशेष म्हणजे, चालान केले जात असल्यामुळे त्यांची आर्थिक समस्या वाढली आहे. करिता वाहतूक नियंत्रण शाखेकडून विनाकारण चालान फाडण्यावर अंकुश लावण्यात यावे अशी मागणी संघटनेने केली असून आमदार अग्रवाल यांना निवेदन दिले. यावर आमदार अग्रवाल यांनी, संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचे व सर्व मागण्यांवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाºयांना दिले.
निवेदन देताना, जिल्हा काँग्रेस वाहतूक संघाचे अध्यक्ष महेश वाधवानी, उमेश शुक्ला, गुड्डू ठाकुर, विष्णु तिवारी, शेरू मक्कड, रज्जाक खान, सचिन ठाकूर, अश्विन खोब्रागडे उपस्थित होते.
अवैध बसेसवर बंदी लावा
संघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्ह्यात अवैधरित्या चालत असलेल्या बसेसवर बंदी लावा, जयस्तंभ चौकात थांबून प्रवासी भरणाऱ्या अवैध वाहनांवर कारवाई करा, ज्या बसेसचे परमीट नाही. त्यांना त्वरीत बंद करा, असोसिएशनच्या नियमांविरोधात चालणाऱ्या आॅटोचालकांवर कारवाई करा, बे्रक टेस्ट पासिंगची व्यवस्था गोंदिया जिल्ह्यात करा, जयस्तंभ चौकात सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजतादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना बस चालक व वाहक धक्के मारून दुसऱ्या बसमध्ये जाण्यास सांगतात. तसेच भरधाव वेगात बसेस चालवित असून अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. करिता येथे वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.