सभापतींच्या निवडीची उत्सुकता
By admin | Published: February 17, 2017 01:42 AM2017-02-17T01:42:08+5:302017-02-17T01:42:08+5:30
नगर परिषदेच्या विषय समित्यांचे गठन करून सभापतींची निवड शुक्रवारी (दि.१७) केली जाणार आहे.
आज विशेष सभा : नावे गुलदस्त्यात, विरोधकांच्या खेळीकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष
गोंदिया : नगर परिषदेच्या विषय समित्यांचे गठन करून सभापतींची निवड शुक्रवारी (दि.१७) केली जाणार आहे. त्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे. याच सभेत उपाध्यक्षांना कोणती समिती द्यावयाची याचाही निर्णय घेतला जाणार आहे. सभापतीपदांवर कोणाकोणाची वर्णी लावायची याबाबत सत्ताधारी भाजपकडून गुप्तता पाळली जात आहे. दरम्यान सभापतीपद पटकावण्यासाठी विरोधक काही खेळी खेळणार का, याबाबतही उत्सुकता लागली आहे.
नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ सुरू झाला असून उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली आहे. फक्त विषय समित्या व सभापतींची निवड बाकी होती. त्यासाठी शुक्रवारी (दि.१७) सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत नगर परिषदेतील बांधकाम समिती, पाणी पुरवठा समिती, महिला व बाल कल्याण समिती, स्वच्छता व आरोग्य समिती, नियोजन समिती व शिक्षण समितींचे गठन करून सभापतींची निवड केली जाईल. सभापतीपदांसाठी इच्छुकांकडून सुरूवातीपासूनच वरिष्ठांची मनधरणी सुरू होती. आता पक्षांकडून कुणाचे नाव पुढे केले जाते व कुणाची सभापतीपदी वर्णी लागते हे शुक्रवारीच दिसून येणार आहे. मात्र पक्षांकडून त्यांच्याकडील उमेदवारांच्या नावांना घेऊन चांगलीच गुप्तता बाळगली जात असल्याचे दिसून आले.
या सभेत उपाध्यक्षांना कोणती समिती देण्यात यावी यावरही निर्णय घेतला जाणार आहे. आतापर्यंत उपाध्यक्षांना स्वच्छता व आरोग्य समिती दिली जात होती. यंदा मात्र त्यात काही तरी बदल होणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यासाठी सभागृहात मताधिक्याच्या आधारावर हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. शिवाय सभापतीपदांसाठी आता नवनवे समिकरण तयार केले जाणार असल्याने सभागृहात नेमके काय होते याबाबत औत्सुक्याचे वातावरण आहे. शुक्रवारी (दि.१७) सकाळी ११ वाजतापासून सभापतीपदासाठी अर्ज घेतले जाणार असून दुपारी २ वाजतापासून सभा सुरू होणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)