यंदा टार्गेट टॉप-५०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:26 PM2018-01-23T23:26:23+5:302018-01-23T23:26:38+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर परिषदेने केलेल्या कामांची पाहणी करून त्यातील त्रुट्यांची दुरूस्ती करण्यासाठी परीक्षक-मार्गदर्शक म्हणून दिल्ली येथून एक व्यक्ती नगर परिषदेत पाठविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर परिषदेने केलेल्या कामांची पाहणी करून त्यातील त्रुट्यांची दुरूस्ती करण्यासाठी परीक्षक-मार्गदर्शक म्हणून दिल्ली येथून एक व्यक्ती नगर परिषदेत पाठविण्यात आली आहे. नगर परिषदेने केलेल्या कामांची सर्वेक्षणानुरूप तंतोतंत तयारी करण्याची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. असे करून नगर परिषदेला टॉप- ५० मध्ये आणण्याचा त्यांचा उद्देश आहे.
आपला देश व प्रत्येक शहर स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन सुरू केले आहे. यांतर्गत नगर परिषदांना मिशन अंतर्गत आखून देण्यात आलेल्या कामांची पूर्तता करायची आहे. त्यावरच त्यावरून शहरांची रँकींग केली जाणार आहे. आता स्वच्छ भारत मिशन-२०१८ ला सुरूवात झाली असून त्या दृष्टीने नगर परिषदा कामाला लागल्या आहे. त्यादृष्टीने कामकाज केले जात आहे. या कामांची पाहणी करून मार्गदर्शन करण्यासाठी मध्यंतरी राज्यस्तरीय समितीच्या दोन सदस्यांनी येथे येऊन नगर परिषद स्वच्छता विभागाला मार्गदर्शन केले होते. मात्र एवढ्यावरच अवलंबून राहणे उचीत नसल्यामुळे नगर परिषद स्वच्छता विभागाने केलेल्या कामांची पाहणी करून त्यात असलेल्या त्रुट्यांची पूर्तता करण्यासाठी व ही सर्व कामे आटोपून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येत असलेल्या केंद्रीय समितीच्या सर्वेक्षणापुर्वी मिशनच्या आराखड्यानुसार सर्व कामे व कागदपत्र तयार ठेवण्यासाठी दिल्ली येथून राहूल शर्मा नामक परिक्षक-मार्गदर्शक येथील नगर परिषदेत आले आहेत. राज्य शासनाच्या मागणीवरून भारतीय गुणवत्ता नियंत्रण आयोगाकडून त्यांना पाठविण्यात आले आहे. केंद्रीय समितीच्या आगमनापर्यंत ते येथे राहणार असून नगर परिषदेच्या सर्व कागदपत्र व केलेल्या कामांची पाहणी करून त्यांना आराखड्यात तंतोतंत बसविण्यासाठी त्यांनी काम सुरू केले आहे.
गोंदियाचा ३४३ वा क्रमांक
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागील वर्षी अवघ्या महाराष्ट्रालाच गालबोट लागले होते. यात गोंदियाचा ३४३ वा क्रमांक होता. यातून नगर परिषदेचा कारभार किती सुरळीत चालतो याची प्रचिती आली होती. आता स्वच्छ भारत मिशन- २०१८ सुरू झाले आहे. यात तरी माघारलेल्या या शहरांचा क्रमांक उंचावा व शहरांची स्थिती सुधारावी यासाठी राज्य शासनाकडून परीक्षक-मार्गदर्शक पाठवून स्वच्छता विभागाने केलेल्या कामांतील त्रुट्यांची दुरूस्ती करण्यासाठी ही सर्व धडपड सुरू असल्याचे दिसते. अशात यंदा नगर परिषद काय नेमके काय साध्य करते याकडे लक्ष लागले आहे.