ग्राहक मंचने केली तक्रार खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 09:25 PM2019-04-28T21:25:56+5:302019-04-28T21:26:44+5:30

बँकेने कर्ज दिले नाही यावरून बँकेविरोधात तक्रार नोंदवून १० लाख रूपये व्याजासह तसेच शारीरिक व मानसिक त्रासासाठी पाच लाख रूपये व कर्जाची रक्कम बँकेने द्यावे, यासाठी तक्रार नोंदविणाऱ्या येथील नूतन श्रीकृष्ण खंडेलवाल यांना ग्राहक मंचने चांगलाच दणका दिला आहे.

The customer complained that the report was excised | ग्राहक मंचने केली तक्रार खारीज

ग्राहक मंचने केली तक्रार खारीज

Next
ठळक मुद्देतक्रारदारालाच दणका : पाच हजार रूपयांचा दंड ही ठोठावला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बँकेने कर्ज दिले नाही यावरून बँकेविरोधात तक्रार नोंदवून १० लाख रूपये व्याजासह तसेच शारीरिक व मानसिक त्रासासाठी पाच लाख रूपये व कर्जाची रक्कम बँकेने द्यावे, यासाठी तक्रार नोंदविणाऱ्या येथील नूतन श्रीकृष्ण खंडेलवाल यांना ग्राहक मंचने चांगलाच दणका दिला आहे. मंचने खंडेलवाल यांची तक्रार खारीज करीत उलट त्यांना पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
प्राप्त माहितीनुसार येथील व्यवसायीक खंडेलवाल यांनी पंजाब नॅशनल बँकेकडे एमएसएमई योजनेंतर्गत २० लाख रूपयांचे कर्ज घेण्यासाठी १८ मे २०१६ रोजी बँकेत खाते उघडून नियमानुसार मागणी केली होती. मात्र बँकेने त्यांना कर्ज मंजूर केले नाही. यावर त्यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार करून १० लाख रूपये १८ टक्के व्याजासह नुकसान भरपाई, मानसिक व शारीरिक त्रासासाठी पाच लाख रूपये, तक्रारीचा खर्च १० हजार रूपये व बँकेने कर्जाची रक्कम द्यावी अशी मागणी केली होती. यावर ग्राहक मंचने नोटीस पाठवून बँकेला आपली बाजू मांडण्यास सांगीतले.
बँकेने आपली बाजू मांडत सांगितले की, खंडेलवाल यांनी एमएसएमई अंतर्गत कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांनी कोणतीही नवीन इमारत अथवा नवीन मशिन्सचे कोटेशन दिले नव्हते. तसेच नगर परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र सोबत जोडले नव्हते. खंडेलवाल यांच्याकडे कर भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी बँकेच्या कर्मचाºयाला लाच देऊन खोटे दस्तावेज सादर करून घेण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर, यात यशस्वी न झाल्याने त्यांनी बँक कर्मचाºयाला शिवीगाळ केली होती.
याबाबत कर्मचाºयाने बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात कळविले असल्याचेही सांगीतले. बँकेचे अधिकारी तपासणीकरिता गेले असता खंडेलवाल यांच्या परिसरात कोणताही नवीन प्लांट व मशिन बसविण्यात आल्याचे दिसले नाही. एवढेच नव्हे तर, खंडेलवाल यांनी, खोटे कागदपत्र तयार करून जिल्हा उद्योग केंद्राची फसवणूक करून शासकीय योजनांचा फायदा घेतला असून त्यासाठी कार्यालयाकडून १० एप्रिल २०१८ रोजी ५३ लाख ४४ हजार ९०७ रूपये, ११ लाख सहा हजार २१३ रूपये, सहा लाख १७ हजार ६८२ रूपये व ११ लाख २५ हजार ७७१ रूपयांच्या वसुलीसाठी नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगीतले. याबाबत कागदपत्रे पुरावे सादर केले. बँकेकडे असलेला पैसा जनतेचा असल्याने कर्ज देताना पूर्ण तपासणी करण्याचे बँकेचे कर्तव्य असल्याचे सांगितले.
खंडेलवाल यांना दिला दणका
तक्रारदार खंडेलवाल व बँकेची बाजू ऐकून घेतल्यानंतर व कागदपत्रांची पाहणी करून ग्राहक मंचने केली. जिल्हाधिकाºयांनी पोलीस अधीक्षकांना ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पत्र पाठवून खंडेलवाल यांनी शासनाची फसवणूक केल्याने त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच वीज वितरण कंपनीने खंडेलवाल यांनी नाव बदलून अनुदानाचा लाभ घेतल्याने कारवाई करण्याचे १ जानेवारी २०१८ चे पत्र बघून खंडेलवाल यांची तक्रार खारीज केली. तसेच ग्राहक संरक्षण कायदा कलम २६ अंतर्गत खोटी तक्रार केल्याबद्दल पाच हजार रूपये दंड ठोठावला. यातील दोन हजार ५०० रूपये बँकेला देण्याचे तर दोन हजार ५०० रूपये जिल्हा ग्राहक कल्याण निधीत आदेशाच्या ३० दिवसांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले आहे.

Web Title: The customer complained that the report was excised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.