ग्राहकांची महावितरणच्या कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:36+5:302021-07-12T04:18:36+5:30
साखरीटोला : वीज वितरण विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे साखरीटोला परिसरातील वीज ग्राहक पूर्णपणे कंटाळले आहेत. दिवसभरात अनेकदा वीज पुरवठा खंडित ...
साखरीटोला : वीज वितरण विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे साखरीटोला परिसरातील वीज ग्राहक पूर्णपणे कंटाळले आहेत. दिवसभरात अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. याची वांरवार तक्रार ग्राहकांनी महावितरणकडे अनेकदा करूनसुद्धा त्याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांनी शनिवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन संताप व्यक्त केला.
गावात पॉवर हाॅऊस नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांनी यासाठी जमीन दिल्यानंतर येथे ३३ केव्हीचे स्वतंत्र वीज उपकेंद्र स्थापन केले. मात्र, यानंतरही परिसरात विजेची समस्या कायम आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाअभावी उकड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात वीज ग्राहकांनी महावितरणकडे तक्रार केल्यानंतर ते तांत्रिक कारण सांगून मोकळे होतात. नियमित वीज पुरवठा करीत नाही. मात्र, विद्युत बिल नियमित पाठवितात. तर वीज ग्राहकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांनी शनिवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्यांचे निवेदन अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या नावे दिले. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नियमित वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच नरेश कावरे, श्रावण राणा, प्रभाकर दोनोडे, सुनील अग्रवाल, रमेश चुटे, राजू काडे, देवराम चुटे, पृथ्वीराज शिवणकर, संजय कुसराम, हिरालाल फाफनवाडे, आशिष अग्रवाल, मनोज गजभिये, संजय मिश्रा, रेखलाल गौतम, रामदास हत्तीमारे, तुषार शेंडे, किशोर कश्यप, नंदू लांजेवार, जयशाम फाफनवाडे, मुन्ना पठाण, विजय येडमे, चंद्रकांत गजभिये, कमलेश चुटे, मेश्राम उपस्थित होते.