कटंगटोला कालव्याचा दगड बनला अडसर
By admin | Published: January 26, 2017 01:35 AM2017-01-26T01:35:04+5:302017-01-26T01:35:04+5:30
ओवारा लघु प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या वळदवरुन जाणाऱ्या कटंगटोला कालव्यातील दगड हा
ओवारा लघु प्रकल्प : अधिकाऱ्यांच्या कारभाराचा शेतकऱ्यांना फटका
आमगाव : ओवारा लघु प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या वळदवरुन जाणाऱ्या कटंगटोला कालव्यातील दगड हा शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरला आहे. या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या तुघलकी कारभारामुळे एक महिन्यापासून कर्दनकाळ ठरलेला दगड फुटत नसल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती मोठी दयनीय झाली आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये व्यापक असंतोष निर्माण झाला आहे.
ओवारा लघु प्रकल्पांतर्गत वळद येथे ७० हेक्टर व कटंगटोला येथे ६० हेक्टर शेतीला उन्हाळी धानाकरिता पाणी देण्याचे ठरले होते. वळद येथील मुख्य मार्गावर खोदकाम करुन कालव्यातील दगड काढणे गरजेचे असल्यामुळे हा दगड फोडण्यास खूप त्रास होत आहे. जोपर्यंत कालव्यातील दगड तोडल्या जात नाही तोपर्यंत कटंगटोला येथील साठ एकर शेतीला सिंचन होणार नाही.
२७ डिसेंबर २०१६ ला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाणी देण्याचे लेखी आश्वासन शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील लाखोळी, जवस नष्ट केले. त्या पिकांचे हातात काही मिळाले नाही व उन्हाळी धानाचे पऱ्हे शेतात लावले. एक महिना लोटूनसुद्धा शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. आता त्वरित पाणी देण्याची मागणी होत असून दगड कसा फोडला जाईल, हाच गंभीर प्रश्न आहे. जर दगड फोडण्याकरिता बारुद, सुरुंग लावला तर शेजारील घरांना झटके लागतील. यामुळे नुकसान घरांची होईल. या भितीने सध्या ओवारा लघू प्रकल्पातील अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.
विशेष म्हणजे साखरीटोला, तिगाव मार्गावर वळद गाव असून मुख्य मार्गाला तोडण्यात आले आहे. हा मार्ग मोठ्या प्रमाणात रहदारीने सुरू असतो. रस्त्याची एक बाजू तयार असून तेथून रहदारी सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मोठी खिंड असल्यामुळे रात्री किंवा दिवसा मोठी दुर्घटना टाळता येऊ शकत नाही. त्यामुळे त्वरित रस्त्याला पाईप टाकून व दगड फोडून शेतकऱ्यांना पाणी देण्याची मागणी जि.प.सदस्य जीयालाल पंधरे, वळद सरपंच किशोर रहांगडाले, गेंदलाल यावलकर, धनेश्वरी चौधरी, दिलीप काटेखाये, उपसरपंच ललीता बिसेन, प्रविण रहांगडाले, हरिणखेडे, पारबता गजबे, ललीता रहांगडाले, हंसगिता रहांगडाले यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)