दुग्ध व्यवसायाने ‘हस्तकला’स मिळाला जगण्याचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:37 PM2018-02-19T22:37:36+5:302018-02-19T22:38:15+5:30
आजारामुळे पतीवर बेरोजगारीची पाळी आली असताना तिरोडा तालुक्याच्या गोंडमोहाळी येथील निशांत स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्य हस्तकला सोहनलाला ठाकरे यांनी गटाच्या मदतीमुळे आपले कुटुंब सांभाळले.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : आजारामुळे पतीवर बेरोजगारीची पाळी आली असताना तिरोडा तालुक्याच्या गोंडमोहाळी येथील निशांत स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्य हस्तकला सोहनलाला ठाकरे यांनी गटाच्या मदतीमुळे आपले कुटुंब सांभाळले. गटातून कर्ज घेवून त्यांनी पशू पालन व दुग्ध व्यवसाय सुरू केला व परिस्थितीवर मात केली. त्यात त्यांच्या पतीलाही रोजगार मिळाला.
हस्तकला यांच्या कुटुंबात त्या, दोन मुले व पती असे चार सदस्य आहेत. त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. पण त्यावर उदरनिर्वाह होत नसल्याने पती अदानी पॉवरमध्ये कामाला जात होते. तेथे काम करीत असताना त्यांचे आरोग्य बिघडले. नातलगांकडून ४५ हजार रूपये उसणे मागून उपचार करावा लागला. जीव संकटात असल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची पाळी आली होती.
अशातच सहयोगिनी व सीआरपी वस्तीत येत व बचत गट बनविण्याबाबत मार्गदर्शन करीत असत. पण महिलांची भांडणे होतात या समजुतीपायी त्या गटात जाण्याचे नाकारत असत. घरची परिस्थिती सुधरली पाहिजे व चांगले जीवन जगले पाहिजे असा विचार करत असताना, एक दिवस हस्तकला यांच्या शेजारच्या घरी सहयोगिनी व सीआरपी यांची बैठक सुरू होती. त्यात कर्ज मिळवून व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन सुरू होते. ते पाहून व ऐकून घेतल्यावर सायंकाळी पतीला सांगून बचत गट तयार करण्याचा निर्णय घेतला.
दर महिन्यात बचत भरताना गटावरचा विश्वास वाढत गेला. सीआरपीच्या मार्गदर्शनात हस्तकला यांनी शेळीपालनासाठी १० हजार रूपयांचे कर्ज घेतले. दोन वर्षात व्याजासह परतफेड केल्यावर १५ हजार रूपयांच्या शेळ्या शिल्लक राहिल्या. दरम्यान सहयोगिनी व सीआरपी यांच्या मार्गदर्शनात एमएलपीची संकल्पना गावात रूजविण्यात आली. सुरभी दुग्ध संकलन केंद्र सप्टेंबर २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. एमएलपीमध्ये त्या सभासद बनल्या.
यानंतर सहयोगिनी व सीआरपी यांच्या मार्गदर्शनात आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेवून म्हैस घेण्याचा निर्णय घेतला. सलग दुसºयांदा गटाने एक लाख ३५ हजार रूपयांचे कर्ज घेतले. त्यातून हस्तकला यांनी ५० हजार रूपयांचे कर्ज घेतले. त्यातून म्हैस खरेदी करून दुग्ध संकलन केंद्रात दूध देणे सुरू केले. दर आठवड्याला दुधाचे पगार नियमित होत असल्याने कर्जाचे हप्ते भरणे सोईचे झाले. दुधाला मिळालेल्या रास्त दरामुळे त्यांचे पती बोदा या शेजारच्या गावातून ४० लिटर दूध आणून दुग्ध संकलन केंद्रात विकतात. झालेल्या नफ्यातून त्यांनी आणखी एक दुसरी म्हैस खरेदी केली.
तसेच दुग्ध ग्राहकांना पशू खाद्य पुरविण्याचा व्यवसायही सुरू केला. त्यात त्यांना प्रति किलोमागे दोन रूपयांचा नफा होतो. तर दोन म्हशींपासून दिवसाला ३० लिटर दुग्ध उत्पादन होते. त्या दुधाला प्रतिलिटर २४ रूपये दर मिळते. त्यानुसार प्रतिदिवस ७२० रूपये मिळतात. तर दिवसाकाठी म्हशीला ८ किलो पशुखाद्य लागतो. त्याला २२ रूपयांप्रमाणे १७६ रूपये खर्च येतो. किरकोळ खर्च १०० रूपये लागतो. अशाप्रकारे दिवसाकाठी त्यांना ५२० रूपये शुद्ध नफा मिळत आहे.
१०० रूपये प्रत्येकीची मासिक बचत
तिरोडा तालुका स्थळापासून १८ किमी अंतरावर धापेवाडा-गोंदिया मार्गावर गोंडमोहाडी गाव आहे. गावात ग्रामपंचायत असून एकूण लोकसंख्या २०९५ आहे. गावात माविम अंतर्गत महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत एकूण २३ बचत गट आहेत. त्यापैकीच निशांत स्वयंसहायता महिला बचत गट आहे. त्यात एकूण १२ महिला असून १०० रूपये प्रत्येकी मासिक बचत गोळा करतात. गटाची मासिक बैठक ५ तारखेला होते. गटाच्या अध्यक्ष प्रभा राऊत व गीता ठाकरे आहेत.
गटामुळे जीवन बदलले
हस्तकला यांना आता एक गाय खरेदी करायची आहे. तसेच पशुखाद्य दुकान सुरू करायची आहे. काहीतरी कमवू व आपला संसार सांभाळू, अशी जिद्द मनात असावी. त्यांचे पतीसुद्धा त्यांना व्यवसायात मदत करतात. आज कितीही संकटे आली तरी गटाचा आधार आहे, असे वाटते. गटात नसती तर हा बदल पहायला मिळाला नसता. गटामुळे जीवन बदलले, असे सांगून त्यांनी प्रभाग समन्वयक, सहयोगिनी, सीआरपी व माविमचे आभार मानले.