ढाकणी येथे धान खरेदी केंद्र सुरू
By admin | Published: December 31, 2015 01:52 AM2015-12-31T01:52:27+5:302015-12-31T01:52:27+5:30
ढाकणी परिसरातील फत्तेपूर, खर्रा, ओझीटोला, पांगळी या आदिवासीबहुल गावातील शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी जवळ असे कोणतेही धान खरेदी केंद्र नव्हते.
गोंदिया : ढाकणी परिसरातील फत्तेपूर, खर्रा, ओझीटोला, पांगळी या आदिवासीबहुल गावातील शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी जवळ असे कोणतेही धान खरेदी केंद्र नव्हते. येथील शेतकऱ्यांना पूर्वी आपले धान विक्रीसाठी २० किमी दूर एकोडी केंद्रावर न्यावे लागत होते. मात्र आता ढाकणी येथे २९ डिसेंबरला नवीन धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर झाला.
अनेक वर्षांपासून ढाकणी येथे धान खरेदी केंद्र सुरू व्हावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु त्यांच्या मागणीची जिल्हा खरेदी-विक्री संघाच्या अधिकाऱ्यांनी पूर्तता केली नव्हती. शेवटी त्यांनी आपली ही व्यथा ढाकणीच्या सरपंच प्रीती मेश्राम व सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष पंकज यादव यांच्यापुढे मांडली. शेतकऱ्यांची ग्राह्य मागणी लक्षात घेऊन त्यांनी जिल्हा खरेदी-विक्री अधिकाऱ्यांशी चर्चा केली व ढाकणी येथे धान खरेदी केंद्राची मागणी रेटून धरली. त्यामुळे खरेदी-विक्री संघाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार (दि.२९) ढाकणीत केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
केंद्राचे शुभारंभ सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष यादव यांच्या हस्ते सरपंच प्रीती मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून संतोष बिसेन, तंमुसचे अध्यक्ष विनोद यादव, वनसमिती अध्यक्ष प्रीतम मेश्राम, देवेंद्र रामटेके, मोहन गौतम, सचिन पालांदूरकर, नितीन टेंभरे, खुशाल मस्करे, ग्रा.पं. सदस्य तुळशीराम मस्करे, डिगूसिंग मडावी, सुनिता नागपुरे, रंजना मस्करे, पोली पाटील संजू रिनाईत, डॉ.एन.एफ. गौतम, राजेंद्र लिल्हारे, गणेशलाल लिल्हारे, कुवरलाल मस्करे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
संचालन संतोष पालांदूरकर यांनी केले. आभार सचिव पटले यांनी मानले. केंद्रात धान विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांनी सात-बाराची मूळ प्रत व बँक पासबुकची छायांकित प्रत सोबत आणावी, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)