श्रमदानातून बांधला बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:30 AM2021-01-19T04:30:33+5:302021-01-19T04:30:33+5:30
सौंदड : उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येथील चुलबंद नदी पात्रात जनशक्ती युवा पॅनलच्या पुढाकाराने श्रमदानातून ग्रामवासीयांनी ...
सौंदड : उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येथील चुलबंद नदी पात्रात जनशक्ती युवा पॅनलच्या पुढाकाराने श्रमदानातून ग्रामवासीयांनी १०० मीटर लांबीचा बंधारा बांधला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे गाव पाणीटंचाईपासून मुक्त होणार असल्याचे दिसून येत आहे.
रविवारी (दि.१७) घेण्यात आलेल्या १ दिवसीय श्रमदानात गावातील शेकडो महिला, पुरुष व युवकांनी एकत्रित येऊन बंधारा निर्मिती केली. गावची लोकसंख्या १० हजारावर असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा चूलबंद नदीच्या पात्रातून ग्रामपंचायतद्वारे करण्यात येतो. गावात सुमारे ७०० खासगी नळधारक असून, ३ ते ४ हजार नागरिकांना दररोज २.४० लाख लीटर पाणी मिळते, परंतु नदीपात्रात कायमस्वरूपी बंधारा नसल्याने उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाई भासू नये, या उद्देशातून जनशक्ती युवा पॅनल, युवा नेटवर्क मैत्री मंच व युवारत्न संघटनेच्या महिला व युवकांनी एक हजार पिशव्यांमध्ये वाळू भरून बंधारा तयार केला आहे.
सरपंच तथा जनशक्ती युवा पॅनलच्या संस्थापक गायत्री इरले यांच्या नेतृत्वात श्रमदानातून बंधारा निर्मितीचा उपक्रम घेण्यात आला. यात जनशक्ती युवा पॅनलचे सचिव रोशन शिवणकर, नंदकिशोर डोंगरवार, लालचंद खडके, रंजना भोई, मिनाक्षी विठ्ठले, दुर्गा ईरले, माधवी शैलेश विठ्ठले, अशोक विठ्ठले, माधुरी यावलकर, गीता मेश्राम, दिक्षा बडोले, संगीता राऊत, स्वाती कोरे, विनोद नंदरधने, दिलीप डोंगरवार, युनेश भेंडारकर, विजय नगरकर, आशिष राऊत, शैलेश राऊत, सुषमा डोये, रूपेश राऊत, ज्योती बर्वे, किरण भूमके, अंजू इरले, लता हटकर, पेमु इरले, राजेश भुसारी, नमिता भेंडारकर, रंजीत चुटे, सुभाष टेंर्भुणे, टिकाराम पातोडे यांच्यासह गावातील शेकडो महिला, पुरुष व युवकांनी सहभाग घेतला.