अवकाळी पावसाने मिरची पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:27 AM2021-03-25T04:27:27+5:302021-03-25T04:27:27+5:30
वाळत घातलेल्या मिरची पिकावर पाणी गेल्याने मिरची काळी पडून योग्य भाव मिळत नाही ही चिंता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत ...
वाळत घातलेल्या मिरची पिकावर पाणी गेल्याने मिरची काळी पडून योग्य भाव मिळत नाही ही चिंता मिरची उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात सोमवार, मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तोडणी करुन वाळत घातलेली मिरची ओली झाली त्यामुळे मिरची काळी पडून नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून मिरची तोडणीचा हंगाम सुरु आहे. मिरची पिकाची तोडणी केल्यानंतर आठ दिवस उन्हात वाळत घालावी लागते ही प्रक्रिया सुरु असतानाच अवकाळी पावसाने वाळत घातलेली मिरची ओली झाली आहे. ओली झालेली मिरची चांगल्या प्रतीची राहत नाही त्यामुळे योग्य भाव मिळत नाही. शासन मिरची पिकासाठी हमीभाव जाहीर करीत नाही त्यामुळे मिरची पिकाला बाजारभाव मिळत नाही. वास्तविक शेतकऱ्यांनी उत्पादित प्रत्येक पिकासाठी हमीभाव देणे आवश्यक असताना शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या कारणाने मिरची उत्पादक शेतकरी नाडला जात आहे.
.....
उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
लागवड खर्चापेक्षा उत्पन्न खर्च कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मिरची लागवड क्षेत्र कमी करुन इतर पिके घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावून मिरची पीक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अगोदरच एक वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटांना शेतकरी वैतागला आहे. मंजूर वर्ग मिळत नाही. या सर्व अडचणींचा विचार करुन केंद्र शासनाने मिरची उत्पन्नाकरिता हमीभाव जाहीर करण्याची मागणी मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
...............
हमीभाव केंद्र सुरु करा
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. येथील मिरची राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र मिरची खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना मिरचीची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरु केल्यास शेतकऱ्यांना मदत होईल.