सततच्या पावसाने नर्सरी व धानपिकांचे नुकसान
By admin | Published: July 23, 2014 11:42 PM2014-07-23T23:42:02+5:302014-07-23T23:42:02+5:30
सडक/अर्जुनी तालुक्यातील तलाठी साजा क्र.१३ अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथील शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे धानपिक व नर्सरी पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे.
शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील तलाठी साजा क्र.१३ अंतर्गत येणाऱ्या शेंडा येथील शेतकऱ्यांचे सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे धानपिक व नर्सरी पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे या परिसरात सतत पंधरा दिवसापासून पाऊस पडल्याने तलाव बोड्या ओव्हरफ्लो झाल्या. छोट्या छोट्या नाल्यांना पाण्याची थोप आहे. तलाव काठावरील धानपिक व नाल्यांना लागून असलेल्या शेतीतील धानपिक चार दिवसापासून पाण्याखाली दबून आहेत. त्यामुळे अगोदरच हवालदील झालेल्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे धानपिक नष्ट झाले आहे.
छत्रपाल परतेकी, मनोज मरस्कोल्हे, भागवत पंधरे, प्रल्हाद पंधरे, बिरजलाल परतेकी, चिंताराम मडावी, सदाराम कोडापे, लालचंद गजभिये, सुरेंद्र वाढीवे, विजय बावनकुळे, रविंद्र बावनकुळे, राजेश चाचेरे, कांतीलाल मेश्राम व राजकुमार दहिवले या शेतकऱ्यांचे धानपिकाचे कमी अधिक प्रमाणात लाखो रुपयाचे धानपिक नष्ट झाले आहे.
पावसाचा कहर होत आहे. अगोदरच कर्जबाजारी शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे सावट त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गाव खेड्यातील शेतकरी आपल्या संपूर्ण कुटुंबासह शेतीत राबतो. त्याचप्रमाणे या परिसरात उद्योगधंदे नसल्याने शेतीवर अवलंबून राहून आपला उदरनिर्वाह करतो.
बँकेकडून घेतलेले कर्ज व इतरांकडून घेतलेल्या उसनवारीची परतफेड कशी करावी. या विचाराने शेतकरी, चिंतातूर झाला आहे. कृषी विभागातील कर्मचारी व महसूल विभागातील तलाठ्याला शेतीची पाहणी करण्यासाठी वारंवार सुचना देऊनही वेळेवर येत नाही. तर तलाठी कार्यालयाच्या चकरा मारुनही तलाठी कार्यालयात हजर मिळत नाही. अशातच विलंब होऊन शेतकऱ्यांकडे कानाडोळा केला जातो, असा सूर शेतकऱ्यांकरवी निघत आहे.
प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी एसीत बसून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतात काय? असा सवालही शेतकरी करीत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी व उदरनिर्वाहासाठी काम देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पावसाळ्याचा दिड महिना लोटल्याने शेतकऱ्यांच्या पहिल्या पेरण्या मृत्यू पावल्या. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. दुबार पेरणी केल्यावर संततधार पावसाने उसंत न दिल्यामुळे टाकलेला धान वाहून गेला. ज्या शेतकऱ्यांनी जेमतेम रोवणी केली त्या शेतकऱ्यजांची रोवणी पाण्यामुळे वाहून गेली. (वार्ताहर)