वादळी पावसाने धान पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 12:20 AM2017-05-11T00:20:09+5:302017-05-11T00:20:09+5:30
उन्हाळी रबी धानपीक शेतकऱ्यांच्या हातात येण्याच्या स्थितीवर असताना ७ मे रोजी रात्रीच्या वेळी आलेल्या पाऊस व वादळामुळे
बळीराजा चिंताग्रस्त : नुकसानभरपाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : उन्हाळी रबी धानपीक शेतकऱ्यांच्या हातात येण्याच्या स्थितीवर असताना ७ मे रोजी रात्रीच्या वेळी आलेल्या पाऊस व वादळामुळे धानपीक खाली पडून धान झडल्यामुळे आणि कापणी झालेल्या धानावर पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने या परिसरात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी चेतन दहीकर, योगेश नाकाडे, सुशील गहाणे, विलास गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे या परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्याच्या उन्हाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे या भागातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. धान पिकाचे चांगले उत्पन्न आपल्या हाती लागेल आणि बँकाचे कर्ज सहजरित्या फेडता येईल, अशी आशा ठेवून नियोजनात शेतकरी वर्ग असताना वादळ व पावसामुळे धानपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवचनेत शेतकरी वर्ग दिसून येत आहे.
काही शेतकऱ्यांचे धान पीक खाली पडून झडले आहेत. काही शेतकऱ्यांची कापणी होवून पीक पावसात ओले झाल्याने योग्य धानाची प्रत हाती लागणार नसल्याने चांगल्या भावात धान विकता येणार नाही. या चिंतेने शेतकरी पार खचून गेले आहेत. यापूर्वी झालेल्या नुकसानीचे शासनाने सर्वेक्षण करुन तुटपुंज्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत केली. धान पिकविण्यासाठी शेतकरी जीवाची पर्वा न करता रात्री बेरात्री शेतावर जावून पिकांची काळजी घेतात. अशावेळी शासनाने योग्य मदत दिली नाही तर शेतकऱ्यांची निराशा होत असते. तरी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे कृषी विभागाने सर्वेक्षण करुन योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चेतन दहीकर, योगेश नाकाडे, सुशील गहाणे, विलास गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.