अवकाळी पावसामुळे रबी धानाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:23 AM2021-05-03T04:23:40+5:302021-05-03T04:23:40+5:30
केशोरी : केशोरी व परिसरात शनिवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान गारपीट व वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे रबी धान ...
केशोरी : केशोरी व परिसरात शनिवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान गारपीट व वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे रबी धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या धान पिकाचे तालुका कृषी विभागाने सर्वेक्षण कयन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
केशोरी परिसरात शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गारपीट व वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी रबी धान पिकाचे नुकसान झाले. निसर्गाच्या अवकृपेमुळे दरवर्षी खरीप हंगामातील होणारी तूट भरून काढण्याचे दृष्टीने या परिसरात ७५ टक्के उन्हाळी धान पीक लावण्यात आले होते. आठ दिवसांत धान पीक शेतकऱ्यांच्या हातात येणार होते; परंतु अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना रडकुंडीस आणले आहे. वास्तविक येत्या काही दिवसातच रबी धान पिकाची मळणी करून पीक शेतकऱ्यांच्या हातात पडणार होते. पीक चांगले व जोमात असल्याने चांगले धानाचे उत्पादन होणार म्हणून शेतकरी वर्ग आशावादी होता; पण गारपीट व वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला आहे. कृषी विभागाने याची दखल घेऊन त्वरित नुकसान झालेल्या रबी धान पिकाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.