नुकसानीच्या सर्वेक्षणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 05:00 AM2022-07-15T05:00:00+5:302022-07-15T05:00:02+5:30

हवामान विभागाने १० ते १४ जुलैदरम्यान जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला असून, १२ व १३ जुलैला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला तर तलाव व बोड्या तुडुंब भरल्या. दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवनसुद्धा काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. पावसाचा सर्वाधिक फटका तिरोडा, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला आहे. 

Damage survey begins | नुकसानीच्या सर्वेक्षणाला सुरुवात

नुकसानीच्या सर्वेक्षणाला सुरुवात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवस झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. तर नदी आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे तीन मार्गांवरील पूल वाहून गेल्याने या गावांचा संपर्क तुटला होता. गुरुवारी (दि. १४) पावसाचा जोर ओसरल्याने जिल्हा प्रशासनाने पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली. प्राथमिक सर्वेक्षणात १५६ घरे आणि गोठ्यांची पडझड झाल्याची बाब पुढे आली आहे. 
हवामान विभागाने १० ते १४ जुलैदरम्यान जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला असून, १२ व १३ जुलैला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला तर तलाव व बोड्या तुडुंब भरल्या. दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवनसुद्धा काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. पावसाचा सर्वाधिक फटका तिरोडा, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला आहे. 
बुधवारी सर्वाधिक १०२ मिमी पावसाची नोंद अर्जुनी मोरगाव तालुक्यात झाली. तर तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यातसुद्धा ९५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पावसामुळे तिरोडा-गोंदिया मार्गावरील एकोडी, बोदा-गोमाटोला, पांगोली-शिवनीटोला मार्गावरील नाल्यावरील पूल वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली. मात्र काही तासांसाठी या गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. 
संततधार पावसामुळे तिरोडा तालुक्यातील ७५, गोरेगाव २१, गोंदिया १३, अर्जुनी ७, देवरी ३ आणि आमगाव तालुक्यातील ४ अशा एकूण १२३ घरांची पडझड झाली. तर ३१ गोठे कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. महसूल विभागाच्या माध्यमातून पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, नुकसानीच्या आकड्यांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाची रिपरिप गुरुवारी देखील कायम होती. 

अनेक कुटुंबे उघड्यावर 
संततधार पावसामुळे जीर्ण झालेली घरे कोसळल्याने अनेक कुटुंबांना भर पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. काही कुटुंबांनी गावातील शाळा व समाज मंदिरांचा आसरा घेतला आहे. या कुटुंबांना घरकूल योजनेचा लाभ देण्याची मागणी केली जात आहे. 
पावसाचे संकट कायम 
हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यातच गुरुवारी दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाचे संकट कायम असून, पावसाचा जोर वाढल्यास नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

रोवणी गेली वाहून 
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून रोवणीच्या कामाला वेग आला आहे. दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत होते. शेतातील बांधांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतातील रोवणीसुद्धा वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 
शेकडो हेक्टर शेती पाण्याखालीच 
वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर नाल्यांना पूर असून, काही भागात पावसाचा जोर कायम असल्याने गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखालीच असल्याचे चित्र आहे. दोन-तीन दिवस हीच स्थिती राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

 

Web Title: Damage survey begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.