अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:27 AM2021-03-25T04:27:52+5:302021-03-25T04:27:52+5:30
सडक अर्जुनी : अवकाळी पावसाने तालुक्यातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून केव्हाही येणाऱ्या अवकाळी ...
सडक अर्जुनी : अवकाळी पावसाने तालुक्यातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून केव्हाही येणाऱ्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील रब्बी पिकांना फटका बसला असून, शेतकरी आर्थिक संकटात आले आहे.
गहू, हरभरा, वटाणा, मसूर, मिरची, आदी पिकांचे नुकसान झाले आहे. वडेगाव, डेपो डोंगरगाव, पुतळी, सिंदिपार, गिरोला, कोकणा, शेंडा, जांभळी, चिखली, सौंदड, मोगरा, भुसारीटोला, कोसमतोंडी, पांढरी, गोंगले या परिसरातील गहू, हरभरा पीक काढण्यायोग्य झाला आहे. पण, निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे हाती आलेले पीक आता खराब होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे गोरगरीब, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सडक अर्जुनी तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५५ हजार ४६१ हेक्टर आर क्षेत्र असून, त्यापैकी रब्बी पिकाखाली क्षेत्र ५९०९ हेक्टर आर क्षेत्रात आहे. गहू ५६० हेक्टर आर क्षेत्र आहे. तालुक्यात हरभरा पीक ७६० हेक्टर आर क्षेत्रात आहे.
..................
निसर्गाचा हा असाच प्रकोप पुढे राहिला तर हरभरा, गहू हे हाती आलेले पीक गेल्याशिवाय राहणार नाही, असे चित्र दिसत आहे.
- तुकाराम लंजे, प्रगतिशील शेतकरी डेपो, डोंगरगाव.
...................
अवकाळी पावसामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची रब्बी पिके आता वाया जात आहे. स्वतःचे शेतातील दोन एकर शेतात लावलेले गहू पीक पावसामुळे शेतातच खराब होत आहे. तालुक्यात पाऊस बऱ्यापैकी आल्यामुळे, आठ दिवस पीक काढता येत नाही.
- गोविंदराव मुनीश्वर, वडेगाव सडक
...............
पावसामुळे रब्बी धान पिकाला फायदा असून, वेलवर्गीय पिके, त्यात टरबूज, डांगरे, कारली पिकांचे नुकसान होत आहे. ही पिके विविध कीड व रोगांना बळी पडत आहे. तालुक्यातील गहू, हरभरा पिकांचे शेतकरी आर्थिक अडचणींत सापडला आहे.
एफ.आर.टी. शहा, प्रगतिशील शेतकरी डव्वा