डेमू हुई बंद और मेमू भी नही चली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 09:43 PM2019-03-15T21:43:42+5:302019-03-15T21:44:24+5:30
गोंदिया-बल्लारशा व गोंदिया समनापूर दरम्यान १५ मार्चपासून मेमू रेल्वे गाडीची सुविधा सुरू करण्यात येणार होती. मात्र शुक्रवारपासून (दि.१५) ही सेवा सुरू न झाल्याने या दोन्ही मार्गावरील हजारो प्रवाशांना याचा फटका बसला. तर ‘डेमू हुई बंद और मेमू भी नही चली’ असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया-बल्लारशा व गोंदिया समनापूर दरम्यान १५ मार्चपासून मेमू रेल्वे गाडीची सुविधा सुरू करण्यात येणार होती. मात्र शुक्रवारपासून (दि.१५) ही सेवा सुरू न झाल्याने या दोन्ही मार्गावरील हजारो प्रवाशांना याचा फटका बसला. तर ‘डेमू हुई बंद और मेमू भी नही चली’ असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
गोंदिया-बल्लारशा, बल्लारशा ते गोंदिया दरम्यान पॅसेंजर आणि गोंदिया ते समनापूर, समनापूर ते गोंदिया दरम्यान डेमू रेल्वे गाडी दिवसातून सहा फेऱ्या मारते. या रेल्वे गाडीला डेमू म्हटले जात होते. मात्र रेल्वे विभागाने दोन दिवसांपूर्वी एक पत्र काढून शुक्रवारपासून (दि.१५) डेमू ऐवजी मेमू रेल्वे गाडी सुरू करण्याची घोषणा केली. तसेच डेमू ट्रेन बंद केली. मात्र त्याऐवजी मेमू ट्रेन सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील प्रवाशांना आपल्या नियोजित स्थळी पोहचण्यासाठी अडचण निर्माण झाली.
शेकडो प्रवाशांना रेल्वे स्थानकावरुन आल्या पावलीच परत जावे लागले. रेल्वे नियोजन चुकण्यामागील कारण मेमूचे डब्बे कमी केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार होती. त्यामुळे या विभागाला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागणार होते. त्यामुळेच हा सर्व प्रकार टाळण्यासाठी शुक्रवारपासून ही मेमू सुरू करण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.
डब्यांच्या बैठक व्यवस्थेत करणार बदल
प्राप्त माहितीनुसार या दोन्ही मार्गावर सुरू असणाऱ्या डेमू गाडीला १४ डब्बे होते. त्यामुळे प्रत्येक फेरीत ११४२ प्रवाशांना जागा मिळत होती. मात्र मेमू गाडी सुरू केल्यानंतर केवळ ८ डब्बेच लावण्यात आले. त्यामुळे केवळ ७९६ प्रवाशांना बसण्याची सुविधा मिळणार होती. ही बाब रेल्वे विभागाच्या उशीरा लक्षात आल्यामुळे त्यांनी १२ डब्ब्यांची मेमू गाडी चालविण्याचा निर्णय घेतला असून त्यात बैठक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. यामुळे जवळपास १२४० प्रवासी या गाडीतून प्रवास करु शकणार आहेत. डब्बे तयार करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बदलाचा प्रवाशांना काय होणार फायदा
गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-समनापूर दरम्यान डेमू ऐवजी मेमू रेल्वे गाडी चालविल्यामुळे प्रवाशांना काय फायदा होईल असा सवाल उपस्थित केला जात आहे. डेमू गाडी ही डिझेलवर तर मेमू गाडी विजेवर धावते. त्यामुळे प्रवाशांच्या नियोजित स्थळी लवकर पोहचणे शक्य होणार आहे. सध्या गाड्यांच्या वेळापत्रकात कुठलाही बदल करण्यात आला नाही. मात्र ट्रायल घेतल्यानंतर त्यात बदल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.