डोंगरगाव/डेपोच्या ‘त्या’ आरोग्य उपकेंद्राची वाताहत
By admin | Published: August 18, 2014 11:35 PM2014-08-18T23:35:00+5:302014-08-18T23:35:00+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडा अंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव/डेपो येथील उपकेंद्रच पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे.
सडक/अर्जुनी : प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडा अंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव/डेपो येथील उपकेंद्रच पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे.
डोंगरगाव/डेपो येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत फारच जुनी आहे. या इमारतीच्या चारही बाजूंनी भेगा पडल्या आहेत. उपकेंद्राला एक मोठी लोखंडी ग्रील लावली आहे. पण मुख्य स्लॅब खाली वाकल्यामुळे ती ग्रील लावता येत नाही. ती ग्रील उघडीच ठेवून त्या उपकेंद्रात राहणाऱ्या मीना कुंभरे या आरोग्य सेविकेला जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहेत. मुख्य म्हणजे हे उपकेंद्र गावाच्या बाहेर असल्यामुळे सेविकेला त्या इमारतीत राहणे भीतीदायक झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात या इमारतीचे भिंतीचे प्लास्टरसुध्दा पाण्याने खाली पडत असल्याचे दिसत आहे. या उपकेंद्राचे दारे व खिडक्यांचे तावदाने पाण्यामुळे सडल्या आहेत. त्यासुद्धा एकदिवस पडू शकतात, अशी भीती निर्माण झाली आहे.
गेल्या १० वर्षांपासून या उपकेंद्राची एकदाही दुरूस्ती करण्यात आली नसल्याची माहिती पुढे येत आहे. सदर उपकेंद्राची डागडुजी करण्यासंबधी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देवून समस्या दूर केली पाहिजे. पण लहान कर्मचाऱ्यांकडे कुणीही लक्ष दिल्या जात नसल्याची खंत डोंगरगावचे सरपंच पुरूषोत्तम मेश्राम यांनी व्यक्त केली आहे.
सदर उपकेंद्राची समस्येबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकाऱ्यांना महिती असूनसुध्दा त्यांनीही लक्ष दिले नाही. गेल्या आठ दिवसांपूर्वी नव्याने रूजू झालेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डुंबरे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी डोंगरगाववासीयांनी केली आहे.
पडक्या उपकेंद्रात राहून जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे आता कठीण झाले आहे. संबंधित वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. या उपकेंद्राची स्लॅब फुटल्यामुळे ठिक-ठिकाणावरून पाणी नेहमीत गळत असते. त्यामुळे येथे औषधोपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना व त्यांच्या नातलगांना मोठाच त्रास होतो. (शहर प्रतिनिधी)