पुराच्या रेतीमुळे पिके धोक्यात
By admin | Published: August 26, 2014 12:04 AM2014-08-26T00:04:06+5:302014-08-26T00:04:06+5:30
गेल्या २३ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पूर येऊन गोंदिया तालुक्यातील बिरसोला, काटी व कासा येथील शेतकरी त्रस्त होवून गेले होते. त्यांच्या शेतात रेती शिरल्याने पीक होणार किंवा नाही
गोंदिया : गेल्या २३ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पूर येऊन गोंदिया तालुक्यातील बिरसोला, काटी व कासा येथील शेतकरी त्रस्त होवून गेले होते. त्यांच्या शेतात रेती शिरल्याने पीक होणार किंवा नाही या समस्येने आजही ते चिंताग्रस्त आहेत.
वाघ-वैनगंगा नदी या परिसरातून वाहते. नदीला आलेल्या पुराचे पाणी जवळील शेतात शिरले. त्यामुळे सदर तिन्ही गावातील नदी किनाऱ्यावरील शेतात लागलेले ऊस, भाजीपाला व धानाचे पीक धोक्यात आले आहेत. ऊसाचे पीक पावसाळ्याच्या या दिवसात वाळण्याच्या मार्गावर आहेत. भाजीपाल्याचे पीक पूर्णत: नष्ट झाले आहे. धानाच्या पिकाचीही तीच स्थिती आहे.
उल्लेखनीय म्हणजे पूर आलेल्या घटनेला आज एक महिन्याचा कालावधी आहे. परंतु प्रशासनाने आतापर्यंत नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामाही केला नाही. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात या परिसरातील शेतकऱ्यांनी एक निवेदन उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांना दिले व त्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली.
निवेदन देतेवेळी शेतकऱ्यांमध्ये ज्ञानचंद जमईवार, रमेश नागफासे, रामप्रसाद जमरे, राजकुमार नागफासे, रामेश्वर नागफासे, केशव नागफासे, गोविंद दंदरे, अनेश बाहे, भरत बाहे व इतर शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)