भाडीपार गावात डेंग्यूसदृश आजाराचे थैमान
By admin | Published: September 19, 2016 12:21 AM2016-09-19T00:21:33+5:302016-09-19T00:21:33+5:30
तालुक्यातील बोदलबोडी ग्रामपंचायत अंतर्गत भाडीपार या गावात अज्ञात आजारामुळे दोन दिवसात दोन लोकांचा बळी गेल्यामुळे
सालेकसा : तालुक्यातील बोदलबोडी ग्रामपंचायत अंतर्गत भाडीपार या गावात अज्ञात आजारामुळे दोन दिवसात दोन लोकांचा बळी गेल्यामुळे भाडीपार गावासह संपूर्ण परिसरात एक दहशत पसरली आहे. तसेच या अज्ञात आजाराचा प्रकोप एवढ्या वेगाने वाढत चालला आहे. की आज गावातील ११ रुग्णांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात तर चौघांना गोंंदियाच्या केटीएस रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. तसेच सातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य चमू गावात दाखल झाली असून प्रत्येकाचे रक्त नमूने घेऊन औषधोपचार करीत आहे. आतापर्यंत या आजाराबद्दल नेमकी माहिती स्पष्ट झाली नसून हा आजार डेंग्यू आजार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. डेंग्यू जीवघेणा आजार असल्यामुळे सर्वत्र एकच दहशत पसरली आहे.
भाडीपार हे गाव वाघनदीच्या काठावर आहे. तालुक्यात चार दिवसापूर्वीच अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीचा फटका भाडीपार गावाला सुद्धा बसला. गावात पुरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. पूर ओसरल्यानंतर गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. शनिवारी (दि.१७) गावातील दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विक्की मुनेश्वर खोटेले (१६) या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रविवारी (दि.१८) ५४ वर्षीय महिला सयवंता इशुलाल गेडाम या महिलेला रुग्णालयात नेत असतानाच रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या दोघाच्या आजाराबद्दल नेमकी माहिती मिळाली नाही. परंतु गावात इतर लोकांनाही आजाराची लागण झपाट्याने होऊ लागली आणि संपूर्ण गाव हादरले. गावातील ११ रुग्णांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात भर्ती करण्यात आले. त्यापैकी सुगन हरिणखेडे (६०), सागर हरिणखेडे (६७), वर्षा खोटेले (१६) आणि जयवंता शेंद्रे (१८) या चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोंदियातील केटीएस जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
तर संगिता उईके (२०), दीक्षा हरिणखेडे (१५), संगीता हत्तीमारे (१९), तरासन हरिणखेडे (२५), मनिषा हरिणखेडे (२८), वर्षा हरिणखेडे (२०), रितू हत्तीमारे (१६) या रुग्णांचा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. आतापर्यंत गावातील ६० लोकांना ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार देण्यात आला आहे. गावात सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.डी. चाटे आपल्या चमूसोबत गावात दाखल झाले असून आरोग्य कॅम्प सुरू केला आहे. प्रत्येकाला औषधोपचार व रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान गावात औषध फवारणी व स्वच्छता मोहीम सुद्धा राबविण्यात येत आहे.
तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी भाडीपार गावाला भेट दिली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आरोग्य विभागाला सतत निर्देश देत आहेत. दरम्यान बोदलबोडीचे सरपंच इसराम बहेकार, उपसरपंच नारायण गेडाम, भाजप तालुकाध्यक्ष परसराम फुंडे, मधू हरिणखेडे, ग्रामसेवक संतोष कुटे आदी गावात दक्षता घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयातील डॉ. अरविंद खोब्रागडे व त्यांचे सहकारी दीपाली भामरे, ममता वाढई, दिपाली पटले, ममता लांजेवार, भीमा पटले, सागर राठोड, ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सतत औषधोपचार देत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
मरण पावलेल्या विक्की खोटेले या मुलाने रक्ताची उल्टी केल्याने डेंग्यूची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्याचे रक्ताचे नमूने घेता आले नाही. तर मरण पावलेल्या सयवंता गेडाम या महिलेचे नमूने घेण्यात आले आहेत. याशिवाय गावात १६० जणांची तपासणी करण्यात आली असून १४८ जणांना किरकोळ ताप आहे. त्यातील १० जास्त ताप असलेल्या १० लोकांचे नमूने घेतले आहेत व त्यात विक्कीचे नातेवाईक आहेत. तसेच संपूर्ण गावात तपासणी करण्यात आली असून फॉगींग सुरू झाली आहे. तर उद्या फवारणी केली जाईल. आरोग्य विभागाकडून कॅम्प लावण्यात आला असून स्थिती नियंत्रणात आहे.
- डॉ. श्यामसुंदर निमगडे
जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया