जिल्ह्यातील ७८ गावांना पुराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:22 PM2019-05-26T23:22:48+5:302019-05-26T23:23:34+5:30
सन २०१९ च्या पावसाळ्यात किती गावांना पुराचा धोका आहे. याचा आढावा घेतांना जिल्ह्यातील चार धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठालगतच्या ७८ गावांना पुराचा फटका बसू शकतो असे दिसून आले आहे. पूर परिस्थितीत या गावांना सतर्क राहण्यासाठी वेळीच उपाय योजना करता याव्या यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सन २०१९ च्या पावसाळ्यात किती गावांना पुराचा धोका आहे. याचा आढावा घेतांना जिल्ह्यातील चार धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठालगतच्या ७८ गावांना पुराचा फटका बसू शकतो असे दिसून आले आहे. पूर परिस्थितीत या गावांना सतर्क राहण्यासाठी वेळीच उपाय योजना करता याव्या यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.
बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागाच्यावतीने सिरपूरबांध, कालीसरार, पुजारीटोला व इटीयाडोह या चार प्रकल्पांची कामे बघितली जातात. मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर बांधण्यात आलेल्या सिरपूरबांध व कालीसरार धरणात पाणी साठविण्यात येते. पूर परिस्थिती पाहता आवश्यकतेनुसार या दोन धरणातील पाणी पुजारीटोला धरणात सोडले जाते. पूर नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने या धरणातून पाणी सोडले जाते. गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी पाच तालुक्यांतील ७८ गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.
त्यात गोंदिया, अर्जुनी-मोरगाव व देवरी या तीन तालुक्यातील प्रत्येकी १३ अशी ३९ गावे, सालेकसा तालुक्यातील १९ गावे व आमगाव तालुक्यातील २० गावांना धोका आहे. गोंदिया जिल्ह्यातून वाहणारी बाघनदी ही वैनगंगा नदीची उपनदी असल्यामुळे बाघ नदीच्या खालच्या भागात लवकरच पूर परिस्थिती निर्माण होते. मध्यप्रदेश राज्यातील सिवनी जिल्ह्यात वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला संजय सरोवर (भिमगड प्रकल्प) पाण्याने भरल्यानंतर पूर परिस्थिती लक्षात घेता तेथीलही पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यामुळे गोंदिया तालुक्यातील १३ गावांना पूर परिस्थितीचा धोका असतो.
रजेगावच्या पुलाची खोली २८० मीटर
गोंदिया-बालाघाट या आंतरराज्यीय मार्गावर रजेगाव येथील जुन्या पुलाची खोली २८० मीटर आहे. या ठिकाणी पुराचा निर्माण धोका होऊ नये तसेच वैनगंगा नदीवरील देवरी, नवेगाव, धापेवाडा येथील पूर परिस्थतीची माहिती प्रशासन वेळोवेळी घेत असते.
या गावांना पुराचा धोका
देवरी : ग्राम सिरपूर, शिलापूर, पदमपूर, बोरगाव बाजार, वडेगाव, पुराडा, कारूटोला, लोहारा, मकरधोकडा, लबानधारणी, हलबीटोला, भोयरटोला व ढिवरीनटोला (१३ गावे).
सालेकसा : ग्राम मूरपार, केहरीटोला, नदीटोला, म्हशीटोला, पंढरपूर, नवाटोला, हलबीटोला, शेरपार, तिरखेडी, भाडीपार, बोदलबोडी, सावंगी, पिपरटोला, झालीया, घोन्सी, महाजनटोला, भाडीपार, मरारटोला, चिचटोला (१९ गावे)
आमगाव : ग्राम माल्ही, धामनगाव, सरकारटोला, ननसरी, मुंडीपार, माल्हीटोली, शंभूटोला, महारीटोला, मोहनटोला, साकरीटोला, गोंडीटोला, मनेकसा, गिरोला, घाटटेमनी, बनियाटोला, बनगाव, ढिमरटोला, खैरीटोला, नागोटोला, जंगीटोला (२० गावे).
गोंदिया : ग्राम छिपीया, कटंगटोला, वडेगाव, कोचेवाही, बनाथर, धामनगाव, सतोना, कोरणी, बिरसोला, बरगावटोला, बुधुटोला, जिरूटोला, नांद्याटोला (१३ गावे)
अर्जुनी-मोरगाव : ग्राम सुरबन, बोंडगाव, चिचोली, करांडली, खोकरी, दिनकरनगर, पुष्पनगर (अ), पुष्पनगर (ब), जरूघाटा, वडेगावबंध्या, सावरी, बोरी, बोडदा (१३ गावे).