धोका ! ग्रीन गोंदियात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:28 AM2021-08-29T04:28:42+5:302021-08-29T04:28:42+5:30
गोंदिया : मागील काही दिवसांपासून ग्रीन असलेल्या गोंदिया तालुक्यात शनिवारी (दि. २८) एका बाधिताची नोंद घेण्यात आल्याने गोंदिया तालुका ...
गोंदिया : मागील काही दिवसांपासून ग्रीन असलेल्या गोंदिया तालुक्यात शनिवारी (दि. २८) एका बाधिताची नोंद घेण्यात आल्याने गोंदिया तालुका पु्न्हा कोरोनाग्रस्तांच्या यादीत आला आहे. विशेष म्हणजे, हळुवार का असो ना मात्र जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढत असून आता ४ झाली आहे. यामुळे धोका वाढत असताना दिसत असून जिल्हावासीयांनी खबरदारी घेण्याची गरज दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्याही शून्यावर आली होती. विशेष म्हणजे, कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हापासूनच हॉटस्पॉट असलेल्या गोंदिया तालुकाही ग्रीन झाला होता. बाधितांची संख्या फक्त १-३ एवढीच असल्याने जिल्हावासीही चांगलेच बिनधास्त झाले होते. नियमांना बगल देत त्यांचा वावर दिसून येत होता. मात्र कोरोना अजून गेला नसून आताही नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे. कारण, शनिवारी (दि.२८) जिल्ह्यात २ बाधितांची नोंद घेण्यात आली असून यामध्ये १ गोंदिया तालुक्यातला आहे. म्हणजेच, कोरोनामुक्त होऊन ग्रीन झालेल्या गोंदिया तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून गोंदिया तालुका हॉटस्पॉट असल्याने आता आणखीच खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तर आमगाव तालुक्यात २ बाधित असून सालेकसा तालुक्यात १ बाधित आहे. आता जिल्ह्यात ४ बाधितांची नोंद असून ही आकडेवारी वाढताना दिसत आहे. अगोदरच तिसऱ्या लाटेबाबत बोलले जात असून त्यात जिल्ह्यातील आकडेवारीत वाढ धोक्याची घंटा आहे.
---------------------------------
निष्काळजीपणा अंगलट येणार
जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याने व राज्य शासनाने सर्वच बाबतीत सूट दिल्याने जिल्हावासी बिनधास्तपणे वावरत आहेत. मास्क व शारीरिक अंतराला बगल देत त्यांचा वावर सुरू असताना दिसत आहे. असाच निष्काळजीपणा जिल्हावासीयांच्या अंगलट आला आहे. मात्र त्याचा जिल्हावासीयांना विसर पडल्याचे दिसते. आता पुन्हा त्यांचा तोच प्रकार सुरू असल्याने निष्काळजीपणा अंगलट येणार व ते टाळण्यासाठी नियमांचे पालन गरजेचे आहे.
---------------------------------
लवकरात लवकर लस घ्या
कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण सुरू असून जिल्ह्याने आता सात लाखांचा टप्पा पार केला आहे. मात्र यामध्ये दुसरी लस घेण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचेही दिसत आहे. आता कोरोना गेला या संभ्रमात ते लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र एवढा बेफिकीरपणा धोक्याचा असल्याने लवकरात लवकर लस घेण्याची गरज आहे.