पाण्याविना पक्ष्यांचे जीवन धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:33 AM2018-06-04T00:33:01+5:302018-06-04T00:33:01+5:30
यंदा सर्वत्र पाण्याची टंचाई भाषत असून याचा फटका आता वन्य जीवांवरसुद्धा बसत असल्याचे दिसत आहे. पाण्याविना अनेक पक्षी व प्राणी लाहीलाही होत आहेत. काही पक्षी व प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेताना दिसत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : यंदा सर्वत्र पाण्याची टंचाई भाषत असून याचा फटका आता वन्य जीवांवरसुद्धा बसत असल्याचे दिसत आहे. पाण्याविना अनेक पक्षी व प्राणी लाहीलाही होत आहेत. काही पक्षी व प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेताना दिसत आहेत. अशात वनविभाग कारागर उपाययोजना करताना दिसत नाही.
मंगळवारी एक पक्षी पंचायत समितीच्या परिसरात भरकटत आला असून तो पाण्यासाठी मृतप्राय होताना दिसून आला. काही कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले तर काहींनी लक्ष दिले. परंतु त्याला वाचविण्यासाठी कोणी सरसावले नाही. एवढ्यात पंचायत समितीच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांने डिस्पोजलमध्ये पाणी घेवून त्याला पाणी पाजले आणि काही वेळात तो पक्षी पाणी पिऊन निवांत झाला.
मात्र लोक बघ्याची भूमिका पार पाडताना दिसत होते. परंतु स्वत:हून त्या पक्षाला वाचविण्यासाठी कोणताही प्रयत्न करताना दिसले नाही.
तालुक्यात पाणवठ्यांचा अभाव
सालेकसा तालुक्याला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभले असून या वनक्षेत्रात विविध जातींचे शेकडो प्राणी आणि पक्षी विचरण करीत असतात. त्या पक्ष्यांना व प्राण्यांना पाणी मिळणे आवश्यक असते. या तालुक्यात धरणे, तलाव, कालवे आहेत. परंतु यंदा सर्व तलाव आटले आहेत. धरणांचे पाणी कालव्यात नेहमी वाहत नाही. तसेच वन क्षेत्रात कोणताही कालवा वाहत नाही. अशात प्राणी व पक्ष्यांना पाणी मिळणे दुर्लभ झाले आहेत. वन विभागाने वन्यजीवांना वाचविण्यासाठी पाणवठे बनवून त्यात रोज पाणी टाकण्याची व्यवस्था करायला पाहिजे. परंतु असे कोणतेही प्रयत्न या तालुक्यात दिसून येत नाही. परिणामी अनेक प्राणी व पक्षी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत असतात. गावाकडे पाणी व इतर खाद्य पदार्थ आढळले की नेहमी येत असतात.